बॉलिवूडमधील लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी धमालच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अजय देवगण स्टारर ‘धमाल ४चा’ रिलीज डेट जाहीर झाला असून, हा चित्रपट आता १० जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कॅरेक्टर पोस्टर्समधून चित्रपटातील धमाल गँग यावेळी मोठ्या खजिन्याच्या शोधात निघाल्याचे संकेत मिळाले आहेत.
या पोस्टर्ससोबत नवीन रिलीज डेटची अधिकृत घोषणाही करण्यात आली. पोस्टर्स पाहता या भागात मूळ गँग जंगल, समुद्रकिनारा आणि समुद्री खलाश्यांच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात मोठ्या खजिन्याचा शोध घेताना दिसणार आहे. पूर्वी ‘धमाल ४’ हा चित्रपट १७ जुलैला येणार होता. मात्र, ३ जुलैच्या दिवशी अल्फा या चित्रपटाच्या रिलीजसंबंधी चर्चांमुळे १० जुलैची तारीख रिकामी होती. याचा फायदा घेऊन आणि चाहत्यांना थोडा आधी मनोरंजन देण्यासाठी दिग्दर्शक इंद्र कुमार आणि निर्माते यांनी १० जुलै रोजी हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला.
धमाल ४ मध्ये फ्रँचायझीची मूळ गँग पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी आणि संजय मिश्रा हे सर्व पात्र धमाल करण्यासाठी तयार आहेत. यासोबतच ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये, विजय पाटकर आणि रवी किशन हे नवीन चेहरे देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.
हा चित्रपट टी-सीरीज, अजय देवगण फिल्म्स आणि मारुती इंटरनॅशनलच्या बॅनरखाली तयार झाला आहे. कौटुंबिक मनोरंजन देणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहे. ‘धमाल ४’मध्ये आधीच्या भागांप्रमाणेच भरपूर हसवा, धुमाकूळ आणि रोमांचक घटनाक्रम असेल, ज्यामुळे प्रेक्षक सिनेमात सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतले राहतील. मूळ गँगच्या हसण्यासोबतच नवीन पात्रांच्या संवादामुळे हा भाग अधिक रंगीत आणि मजेशीर होईल, अशी अपेक्षा आहे. म्हणूनच, धमालच्या चाहत्यांसाठी १० जुलै २०२६ ही खूपच खास तारीख ठरणार आहे, जेव्हा अजय देवगण आणि त्याच्या मित्रांचा हा धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळेल.









