-
नागपूर : ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल नागपूरच्या प्रतिनिधी मंडळाने आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी प्रतिनिधीमंडळाने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि बीएसएनएलच्या कार्यकारी तसेच अकार्यकारी कर्मचाऱ्यांच्या तृतीय वेतन सुधारणा प्रस्तावाला लवकर मंजुरी मिळून त्याची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी निवेदन सादर केले. या विषयात हस्तक्षेप करून आवश्यक सहकार्य करण्याची विनंतीही प्रतिनिधी मंडळाने केली.
-
निवेदनात नमूद करण्यात आले की, बीएसएनएल कर्मचाऱ्यांसाठी तृतीय वेतन सुधारणा १ जानेवारी २०१७ पासून देय आहे. मात्र, जवळपास सात वर्षे उलटूनही कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. या दीर्घ विलंबाबद्दल संघटनेने चिंता व्यक्त केली. वेतन सुधारणेच्या अंमलबजावणीत होत असलेल्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि कार्यक्षमता यावर विपरीत परिणाम होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
-
या प्रकरणात ‘अफोर्डेबिलिटी क्लॉज’ अर्थात आर्थिक परवडण्याच्या अटीचा अडथळा वारंवार पुढे केला जात आहे. निवेदनानुसार, बीएसएनएल व्यवस्थापनाने आवश्यक औपचारिकता पूर्ण करून, स्वतःच्या शिफारशींसह वेतन/वेतनश्रेणी सुधारणेचा प्रस्ताव २४ फेब्रुवारी २०२६ रोजी दूरसंचार विभागाकडे पाठविला आहे. तरीही हा प्रस्ताव विचाराधीन असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
-
अफोर्डेबिलिटी क्लॉजमधून सूट देण्याबाबत दूरसंचार विभागाने पाठवलेल्या पत्राच्या उत्तरात, सार्वजनिक उपक्रम विभागाने बीएसएनएलच्या कार्यकारी व अकार्यकारी कर्मचाऱ्यांच्या तृतीय वेतन/वेतनश्रेणी सुधारणेचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या संदर्भातील आवश्यक कारवाई अद्याप प्रलंबित असल्याचे संघटनेने नमूद केले आणि कर्मचाऱ्यांच्या या न्याय्य मागणीवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
-
ग्रामीण आणि दुर्गम भागात परवडणाऱ्या दूरसंचार सेवा पुरविणे, स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे तसेच ४ जी सॅच्युरेशन आणि भारतनेटसारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या अंमलबजावणीत बीएसएनएल महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे संघटनेने अधोरेखित केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीचे न्याय्य निराकरण हे बीएसएनएलचे पुनरुज्जीवन, आधुनिकीकरण आणि विकासासाठीही महत्त्वाचे असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. या विषयात हस्तक्षेप करून हा मुद्दा पंतप्रधान, केंद्रीय संचार मंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री यांच्यासमोर मांडावा तसेच बीएसएनएलच्या कार्यकारी व अकार्यकारी कर्मचाऱ्यांच्या तृतीय वेतन सुधारणेला लवकर मंजुरी मिळवून त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती प्रतिनिधी मंडळाने गडकरी यांना केली. यावेळी नितीन गडकरी यांनी कर्मचाऱ्यांच्या मागणीची आपल्याला पूर्ण जाणीव असल्याचे सांगितले. हा मुद्दा आपण निश्चितपणे वरिष्ठ स्तरावर मांडू, असे आश्वासन त्यांनी दिले, तसेच या प्रकरणात पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी प्रतिनिधी मंडळाला दिली. प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व सुमीत उपाध्याय यांनी केले. यावेळी पंकज भुजबळ, व्यंकटेश नायडू, हरेंद्र पांडे, संतोष सुरपाटणे, सौरभ डांगरे आणि दीपक कुलकर्णी उपस्थित होते.
October 26, 2026
0 Comment
0 Views
बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या तृतीय वेतनाचा प्रश्न गडकरींच्या दरबारी
by Digital Desk
लोकवाहिनी न्यूज नागपूर : ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल नागपूरच्या प्रतिनिधी मंडळाने आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी प्रतिनिधीमंडळाने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि बीएसएनएलच्या कार्यकारी तसेच अकार्यकारी कर्मचाऱ्यांच्या तृतीय वेतन सुधारणा प्रस्तावाला लवकर मंजुरी मिळून त्याची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी निवेदन सादर केले. या विषयात हस्तक्षेप करून आवश्यक सहकार्य... Read More













