क्वालिटी कॉन्सेप्ट्सवरील राष्ट्रीय संमेलनाचे उत्साहात उद्घाटन
-
लोकवाहिनी न्यूज
-
नागपूर : गुणवत्ता ही केवळ एक संकल्पना किंवा घोषणापत्र नसून, ती प्रत्येकाच्या आचरणात उतरली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात ज्ञान, कौशल्य आणि अनुभव महत्त्वाचे असले, तरी त्यासोबत व्यक्तीची निष्ठा, उत्तरदायित्व, दृष्टिकोण आणि मनोर्धैर्य यांनाही तितकेच महत्त्व आहे. विशेषतः स्फोटके आणि दारूगोळा निर्मिती क्षेत्रात गुणवत्ता व सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता कामा नये, असे प्रतिपादन पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांनी केले.
-
क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया (क्यूसीएफआई), नागपूर चॅप्टर आणि रामदेवबाबा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ३७ व्या चॅप्टर कन्व्हेन्शन ऑन क्वालिटी कॉन्सेप्ट्स (सीसीक्यूसी-२०२६) चे उद्घाटन सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष पद्मश्री सत्यनारायणजी नुवाल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
-
यावेळी मंचावर श्री रामदेवबाबा सार्वजनिक समितीचे सरचिटणीस राजेंद्र पुरोहित, रामदेवबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश पांडे, जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्ट्स लिमिटेड, कळमेश्वरचे प्लांट हेड अजय खंडेलवाल, क्यूसीएफआईचे अध्यक्ष अविनाश मिश्रा, संचालक अविनाश उपाध्याय आणि कार्यकारी संचालक डी. के. श्रीवास्तव उपस्थित होते. चेअरमन एमिरिटस, क्यूसीएफआई नागपूर चॅप्टरचे विवेक श्रीती, क्यूसीएफआईचे कार्यकारी संचालक ए. के. जैन तसेच क्यूसीएफआई नागपूर चॅप्टरचे सचिव विवेक जोशी उपस्थित होते. रामदेवबाबा विद्यापीठ येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी ‘संकल्प’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
-
संरक्षण क्षेत्रातील बदलांचा उल्लेख करताना नुवाल यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत युद्धपद्धतीत आमुलाग्र बदल झाले आहेत. ड्रोन, काउंटर-ड्रोन प्रणाली, क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याची संरक्षण प्रणाली यासारख्या तंत्रज्ञानाचे महत्व वाढले आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही. देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उत्पादन क्षमता आणि पायाभूत सुविधांसोबत सक्षम मनुष्यबळ, कौशल्य आणि जबाबदार कार्यसंस्कृती विकसित करणेही आवश्यक आहे. भारत सध्या ‘विकसित भारत २०४७’ च्या संकल्पसह एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा असून हे ध्येय साध्य करण्यासाठी देशातील मॅन्युफॅक्चरिंग क्षमता मजबूत करणे आणि संशोधन व विकासवर विशेष भर देणे काळाची गरज असल्याचे अजय खंडेलवाल यांनी सांगितले. आपल्याला जर ‘मिशन २०४७: विकसित भारत, आत्मनिर्भर भारत’ हे स्वप्न पूर्ण करायचे असेल आणि देशस जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचे असेल, तर प्रत्येक क्षेत्रात उच्च गुणवत्तेचा अवलंब करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन अविनाश मिश्रा यांनी केले











