लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूरच्या राजघराण्याची समृद्ध संस्कृती आणि धार्मिक वारसा जपत, राजे मुधोजी भोसले यांच्या निवासस्थानी म्हणजेच सीनियर भोसला पॅलेस येथे यंदा २९८व्या वर्षी गणरायाचे पालखीतून आगमन झाले.
भोसला पॅलेस येथे १७२८ पासून अविरत सुरू असलेल्या या ऐतिहासिक परंपरेनुसार गणपती बाप्पांची रथातून व पालखीतून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजाअर्चना आणि धार्मिक विधींच्या गजरात प्रतिष्ठापना करण्यात आली.
नागपूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात विशेष स्थान असलेल्या या भोसला पॅलेस गणपतीची काही अनोखी वैशिष्ट्ये शहराचे आकर्षण ठर्तात. राजघराण्याच्या खास परंपरेनुसार गणपती बाप्पाला राजेशाही पगडी परिधान केली जाते. गेल्या २९८ वर्षांपासून बाप्पांच्या मूर्तीचा रंग, आकार, उंची आणि मूळ स्वरूपात कोणताही बदल न करता ते तंतोतंत कायम राखण्यात आले आहे. नागपूरच्या भोसला राजघराण्याने हा ऐतिहासिक वारसा आजही तितक्याच निष्ठेने जपला आहे.











