दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआईचा एफआयआर दाखल
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी सीबीआईने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर दाखल केला. यात उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे, रोहन रॉय, अभिनेते डिनो मोर्रिया आणि सूरज पांचोली, आदित्य यांचे अंगरक्षक, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, डीसीपी विशाल ठाकूर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे.
एफआयआर दाखल करण्यासोबतच सीबीआईने हत्या, सामूहिक बलात्कार, कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्यासह गंभीर आरोपांच्या अनुषंगाने तसााला सुरुवात केली आहे. त्यामुळे दिशा सालियानच्या मृत्यूमागील नेमके गूढ काय, याचा उलगडा होण्याच्या आशा पुन्हा निर्माण झाल्या आहेत. दिशाने आत्महत्या केल्याचे सुरवातीला सांगण्यात आले होते. मात्र, तिच्या पालकांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत तिच्या मृत्यूमागे कटकारस्थान असल्याचा दावा केला होता.
उच्च न्यायालयाचे सीबीआई चौकशीचे आदेश
या महिन्याच्या सुरवातीला मुंबई उच्च न्यायालयाने सालियानच्या मृत्यूबाबत सीबीआई चौकशीचे आदेश दिले आणि सहा वर्षांपर्यंत एफआयआर नोंदवण्यात अपयश आल्याबद्दल मुंबई पोलिसांवर टीका केली होती. पोलिसांच्या तपासातून उत्तरांपेक्षा प्रश्नच अधिक निर्माण होतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणाकडे केवळ अपघाती मृत्यू म्हणून पाहण्याच्या निर्णयावरही खंडपीठाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तपासातील स्पष्ट विसंगतींकडे लक्ष वेधले.
सीबीआईने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अनेक पोलिस अधिकारी, फॉरेन्सिक अधिकारी, डॉक्टर आणि इतर व्यक्तींची नावे आहेत. उद्धव ठाकरे तसेच इतरांनी या कटात आणि नंतरच्या प्रकरणातील पुरावे लपवण्याच्या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावली. संबंधित लोकसेवक आणि पोलिस अधिकारी हे प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे, फाइल्स आणि इतर सार्वजनिक नोंदी नष्ट करणे किंवा दडपून ठेवणे, अधिकृत नोंदींमध्ये फेरफार करणे तसेच गुन्हेगारांना वाचवण्यासाठी आणि बेकायदेशीर उद्देशांसाठी सार्वजनिक निधी, मनुष्यबळ आणि पोलिस यंत्रणेचा गैरवापर करणे यासारख्या गोष्टींसाठी चौकशीस पात्र आहेत, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.











