लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत २४ हजारांहून अधिक मते मिळवून राजकीय ताकत दाखवून देणारे नितेश कराळे गुरुजी आता स्वतंत्र राजकीय वाटचाल करण्याच्या तयात आहेत. नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यांनी पावले उचलली असून, पक्षाचे नाव काय असावे, याबाबत जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. यासाठी त्यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित केला. त्याला नागरिकांडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, विविध नावांच्या सूचना करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, पक्षाची घटना तयार असल्याचा दावा कराळे यांनी केला आहे.
नितेश कराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा प्रस्तावित पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा आवाज बनणार आहे. त्यामुळे पक्षाचे नावही जनतेमधूनच निश्चित व्हावे, अशी त्यांची भूमिका आहे. पक्षाची नवीन घटना तैयार करण्यात आली असून, ती सर्वसामान्यांना न्याय देणारी असेल, असे त्यांनी सांगितले. पक्ष स्थापनेच्या दृष्टीने आवश्यक तयारी पूर्ण झाली असून, जनतेकडून आलेल्या सूचनांचा विचार करून पक्षाचे नाव निश्चित केले जाईल. त्यानंतर आगामी काळात पक्षाची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असेही कराळे यांनी स्पष्ट केले.
कराळे यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओवर जवळपास अडीच हजारांहून अधिक नागरिकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यामध्ये काहींनी त्यांना स्वतंत्रपणे सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता नसल्याचे मतही काहींनी व्यक्त केले. दूसरीकडे, अनेकांनी नवीन पक्षासाठी विविध नावे सुचवली आहेत. यामध्ये ‘विदर्भ विकास आघाडी’, ‘युवा जनसंघ आघाडी’, ‘स्वराज्य जनसेवा पार्टी’ अशा नावांचा समावेश आहे. तसेच पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘कलम’ असावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य आणि सुशासनाच्या संकल्पनेवर आधारित नाव असावे, असेही काहींनी सुचवले आहे.
पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या आरोпаवरून नितेश कराळे गुरुजी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि निवडणुकीत शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याचा संभ्रम निर्माण केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर कार्रवाई करण्यात आली होती. पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या स्वाक्षरीचे कार्रवाईचे पत्रही त्यांना देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कराळे यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

















