महापाौरांनी घेतला आढावा
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध सुविधांची व्यवस्था करण्यात येते. या सर्व आवश्यक सुविधांची नियोजनबद्ध पूर्व तयारी करावी, तसेच दीक्षाभूमी येथे व्यवस्थेत असणाऱ्या सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी दिले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवरील सुविधांचा आढावा महापौर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १) घेण्यात आला. आढावा बैठकीत उपमहापौर लिला हाथीबेद, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, आयुक्त डॉ. विपिन इटनकर, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, लक्ष्मीनगर झोन सभापती तारा यादव, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकित, पोलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी, संदीप पखाले, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त राजेश भगत, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, सहायक आयुक्त धनंजय जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलokar, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह झोनल स्वच्छता अधिकारी, एनएमआरडीए, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून लाखोच्या संख्येत बौद्ध अनुयायी नागपूर शहरातील दीक्षाभूमीला भेट देतात. या सर्व नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे १८ ते २२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्व मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्याचे निर्देश महापौर ठाकरे यांनी बैठकीमध्ये दिले. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणे, संपूर्ण परिसरात स्वच्छता राखणे, सर्वत्र विद्युत पुरवठा करणे, पिण्याचे पाणी, शौचालय, परिवहन सेवा या सर्व सुविधा सुरळीतपणे चालवल्या जातील, या दृष्टीने नियोजन करण्याचेही त्यांनी निर्देशित केले.
तसेच मनपा अधिकारी, पोलिस विभागाचे अधिकारी व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करून आवश्यक त्या सुविधा पुरविण्याच्या सूचना आयुक्त डॉ. इटनकर यांनी दिल्या. तसेच अंबाझरी तलावावर अनुयायी मोठ्या संख्येत आघोळीसाठी जात असतात या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन विभागाची चमू, बोट तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन चमू तैनात करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले. दीक्षाभूमीच्या परिसरात लावण्यात येणाऱ्या स्टॉलवर कुठेही सिलेंडर अथवा तत्सम ज्वलनशील वस्तूंचा वापर होऊ नये याबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
बैठकीच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी मनपातर्फे उभारण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधांची माहिती दिली.









