रोड स्वीपिंग अन पोकलनेचे लोकार्पण
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा समावेश करण्यात आला आहे. यातील १२ रोड स्वीपिंग मशीन आणि ४ चेन क्रॉलर एक्सकॅवेक्टर (पोकलने) मशीनचे लोकार्पण मध्यवर्ती वर्कशॉप येथे महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आयुक्त डॉ. विपिन इनटकर, उपमहापौर लीला हाथीबेड, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, आरोग्य सेवा समितीच्या सभापती मनीषा अतकरे, सहाय्यक आयुक्त प्रमोद वानखेडे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेन्द्र महल्ले, स्वच्छता निरीक्षक लोकेश बासनवर आणि सुरेश खरे यांच्यासह जेसीबीचे कर्मचारी उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत नागपूर महानगरपालिकेला १२ रोड स्वीपिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशीनची खरेदी अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (२.०) यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या १२ मशीनसाठी एकूण ५.५८ कोटींच्या रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून, प्रत्येक मशीनची किंमत ४६.५० लाख रुपये इतनी है. या रोड स्वीपिंग मशीनची क्षमता ३ क्यूबिक मीटर इतकी आहे. या मशीनची निर्मिती बैक्सी लिमिटेड या कंपनीद्वारे करण्यात आली असून, त्यासाठी टाटा मोटर्सचे चेसिस वापरण्यात आले आहे. या आधुनिक मशीनच्या माध्यमातून शहरातील प्रमुख आणि महत्त्वाच्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने अधिक जलद व प्रभावी साफसफाई करणे शक्य होणार आहे. रस्त्यांवरील धूल, माती आणि कचरा काढण्यासाठी या मशीनचा उपयोग होणार असून, शहराच्या स्वच्छतेच्या दर्जात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
शहरातील अरुंद नदी-नाले तसेच पुलाखाली साचलेला कचरा यांत्रिकी पद्धतीने साफ करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने ४ चेन क्रॉलर एक्सकॅवेक्टर (पोकलने) मशीन खरेदी केल्या आहेत. या मशीनची खरेदी जिल्हा नियोजन समिती, नागपूर जिल्हा यांच्याकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत प्राप्त निधीतून करण्यात आली आहे. प्रत्येक मशीनची क्षमता ५ टन असून, त्याची बकेट क्षमता ०.२२ क्यूबिक मीटर इतकी है. प्रत्येक मशीनची किंमत रु. ३७ लाख ८० हजार असून, चार मशीनच्या खरेदीसाठी एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. या मशीनचा पुरवठा मेसर्स जी. के. ऑटोव्हील्स प्राइवेट लिमिटेड यांच्यामार्फत करण्यात आला आहे. नदी-नाल्यांमध्ये तसेच पुलाखाली साचणारा कचरा आणि गाळ काढण्यासाठी या मशीनचा उपयोग होणार आहे. विशेषतः अरुंद भागांमध्ये यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करणे अधिक सुलभ होणार असून, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठीही या यंत्रसामग्रीची मदत होणार आहे.
यावेळी महापौर ठाकरे यांनी शहर स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला. या यंत्रसामग्रीवर काम करणाऱ्या मनुष्यबळाला योग्य आणि आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे. अशा सूचना त्यांनी यावेळी दिली.













