अभिनेत्री यामी गौतम धर हिच्या ‘नई नवेली’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांत जगभरात १६.२६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
‘नई नवेली’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४.६० कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ होऊन हा आकडा ५.७० कोटी रुपयांवर पोहोचला. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने जगभरात ५.९६ कोटी रुपयांचा ग्रॉस व्यवसाय केला. त्यामुळे पहिल्या तीन दिवसांतील चित्रपटाची एकूण जागतिक कमाई १६.२६ कोटी रुपये झाली आहे. पहिल्या वीकेंडमधील या कामगिरीमुळे आगामी दिवसांत चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चित्रपटाची कथा रामायणाशी संबंधित कल्पना आणि एका अनोख्या कुटुंबाभोवती फिरते. देशी फॅटसीच्या शैलीत तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात अवस्थी कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
विनोद, भावना आणि कौटुंबिक नातेसंबंध यांची सांगड घालून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात संपूर्ण कुटुंबासोबत चित्रपट पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांना लक्षात घेऊन त्याची मांडणी करण्यात आली आहे. बालाजी मोहन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हिमांशू शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. यामी गौतमसोबत आदिनाथ एम. कोठारे, अनुराग ठाकूर, सुनीता राजवार, मीता वशिष्ठ,
आदित्य कुलश्रेष्ठ, सुस्मिता मुखर्जी आणि प्रतीक पचौरी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहेत. आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. अमेझॉन एमजीएम स्टुडिओ आणि कलर येलो या निर्मिती संस्थांच्या बॅनर्जीखाली तयार झालेला ‘नई नवेली’ सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. पहिल्या वीकेंडमधील कमाईनंतर आता चित्रपटाला पुढील दिवसांत कसा प्रतिसाद मिळतो, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.














