लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते दुपारी १२ वाजता, वडोदरा इथे ३५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. संध्याकाळी सुमारे ५:४५ वाजता, पंतप्रधान मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट अर्थात जागतिक वित्तीय तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन करतील, यावेळीही ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
वडोदरा दौऱ्यात पंतप्रधान पश्चिम विभागीय समर्पित मालवाहु कॉरिडॉर अंतर्गत ३२६ मार्ग किलोमीटर व्याप्तीच्या आणि २०,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून उभारलेल्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांचे राष्ट्रार्पण करतील. यात साणंद (उत्तर) मकरपुरा, न्यू उंबरगाव-न्यू सफाळे आणि न्यू सफाळे-जेएनपीटी या टप्प्यांचा समावेश आहे.
या प्रकल्पामुळे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणासोबतची थेट दळवळणीय जोडणी उपलब्ध होणार आहे. परिणामी आयात-निर्यातीसंदर्भात होणारी मालवाहतूक जलद गतीने होण्यास मदत होईल .














