अजित पवार प्रकरणात फडणवीसांवर आरोप
लोकवाहिनी न्यूज”मुंबई : अजितदादांच्या अपघाताला ४ महिने होत आले, पण मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिलेला गुन्हेगारांना शोधण्याचा व सीबीआय चौकशीबाबत शब्द अजूनही पाळलेला नाही, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला चार महिने पूर्ण होत असताना, या प्रकरणाचा तपास आणि त्यावरील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. काळ जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे या अपघाताच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या सविस्तर पोस्टमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
अजितदादांच्या मृत्यूमागील सत्य बाहेर यावे, दोषींना शिक्षा व्हावी आणि तपास निष्पक्ष व्हावा, अशी राज्यातील जनतेचे अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. २८ जानेवारी २०१६ रोजी बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या खासगी विमानाचा भीषण अपघात झाला होता. विमान लँडिंगच्या काही क्षण आधीच हवेत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा, विमान तज्ज्ञ आणि तपास यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सुरुवातीला हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र काही दिवसांनी या प्रकरणात संशय व्यक्त केला जाऊ लागला आणि तपास अधिक गुंतागुंतीचा बनला.
विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात दोषींना शोधून काढण्याचे आश्वासन दिले होते. गुन्हेगार पाताळात लपले तरी त्यांना बाहेर काढू, असे विधान त्यांनी सभागृहात केले होते. याशिवाय या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. कर्नाटकात नोंद झालेली झिरो एफआयआर महाराष्ट्रात वर्ग करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, आता अडीच महिने उलटल्यानंतरही या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट उद्देशून म्हटले की, सरकारने दिलेल्या शब्दाचे काय झाले हे जनतेसमोर स्पष्ट करावे. केवळ भाषणामध्ये मोठमोठ्या घोषणा करून चालणार नाही. प्रत्यक्षात तपास कुठपर्यंत पोहोचला, याची माहिती राज्याला मिळाली पाहिजे.
रोहित पवार यांनी सीआयडीच्या तपासावरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, तपासाची गती अत्यंत संथ असून यंत्रणांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात ते स्वतः सीआयडी कार्यालयात गेले होते. मात्र तपास अधिकारी अनुपस्थित होते. त्यांनी काही महत्त्वाचे पुरावे मेलद्वारे आणि लेखी स्वरूपात दिले, तरी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.










