लोकवाहिनी न्यूज:मुंबई : राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बुधवारी आपली राज्यसभा खासदारकी सोडल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यांच्या या निर्णयाने राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपले राजीनामा पत्र सादर केले. सुनेत्रा पवार यांनी आपली खासदारकी सोडण्याचे कारण म्हणजे नुकतीच झालेली बारामती विधानसभा पोटनिवडणूक, जिथे त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजयी मिळवली. निवडणुकीच्या निकालानुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना तब्बल २,१८,९३० मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उतरणाऱ्या २२ उमेदवारांसह नोटा यांना फक्त ४,८३७ मते मिळाली. या निकालाने बारामतीतील पवार कुटुंबाचा परंपरागत प्रभाव स्पष्ट केला आहे, तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ मध्ये स्थापन केलेला मताधिक्याचा विक्रमदेखील मोडला गेला.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली होती. या काळात त्यांनी पक्षाचे आणि प्रशासनाचे कामकाज हाताळले, तसेच बारामतीसह संबंधित जिल्ह्यांमध्ये राजकीय नेतृत्व बजावले. बारामती विधानसभा निवडणूक हा त्यांच्या नेतृत्वाखालील पहिला मोठा संघर्ष ठरला आणि त्यांनी तो विक्रमी मताधिक्याने जिंकून दाखवला. नियमांनुसार, दोन्ही सभागृहात निवडून आलेल्या नेत्याला एका सभागृहाचा राजीनामा १४ दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. त्यामुळे, बारामतीत आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेतून रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे, आणि यावर राष्ट्रवादीसह इतर राजकीय पक्षांमध्येही चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवारांच्या विजयानंतर बारामतीत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. घराघरांत फटाके वाजवले गेले, गुलाल उधळले गेले आणि पवार कुटुंबाच्या नेतृत्वाखालील शहरातील राजकीय वातावरण उत्साहात भरले.









