१०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
लोकवाहिनी न्यूज
कराकास : व्हेनेझुएलामध्ये बुधवारी सायंकाळी सलग आलेल्या दोन शक्तिशाली भूकंपांनी मोठी हानी घडवून आणली. पहिला भूकंप ७.२ तर दुसरा ७.५ तीव्रतेचा होता. या भूकंपामुळे राजधानी कराकासमध्ये अनेक इमारती कोसळल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्यूटो रिको आणि वर्जिन बेटांसाठी सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. सरकारने नागरिकांना मोकळ्या जागेत राहण्याचे आणि मदत व बचावकार्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. या भूकंपात १० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या (यूएसजीएस) माहितीनुसार, पहिला भूकंप रिश्टर स्केलवर ७.२ तीव्रतेचा होता. त्याचे केंद्र व्हेनेझुएलाच्या कॅरिबियन किनारपट्टीवरील मोरोन शहराच्या पश्चिमेस आणि कराकासपासून सुमारे १६८ किलोमीटर अंतरावर होते. या भूकंपाची खोली १३ किलोमीटर नोंदवण्यात आली. पहिल्या धक्क्यांनंतर काही मिनिटांतच ७.५ तीव्रतेचा दुसरा आणि अधिक शक्तिशाली भूकंप झाला. त्याची खोली १० किलोमीटर होती. त्याचे केंद्र मोरोन शहराच्या नैऋत्येस १६ किलोमीटर अंतरावर होते. या भूकंपानंतर अमेरिकेच्या पॅसिफिक सुनामी चेतावणी केंद्राने प्यूटो रिको आणि वर्जिन बेटांसाठी सुनामीचा इशारा जारी केला.
व्हेनेझुएलाचे गृहमंत्री डिसोसादो काबेलो यांनी सांगितले की, भूकंपाचे धक्के देशातील अनेक राज्यांमध्ये जाणवले. कराकासमध्ये अलतमीरा परिसरात घरे आणि इमारती कोसळल्याच्या चिंताजनक घटना घडल्या आहेत. काबेलो यांनी नागरिकांना सध्या मोकळ्या जागेत राहण्याचे आवाहन केले आहे. भूकंपानंतरचे धक्के (आफ्टरशॉकस्) बसण्याची शक्यता असल्याने आधीच नुकसान झालेल्या इमारतींना आणखी धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. या भूकंपात काही लोक जखमी झाल्याचे संकेतही त्यांनी दिले. तसेच वाहनचालकांनी रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना मार्ग मिळावा यासाठी रस्ते मोकळे ठेवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
भारताकडून मदतीची तयारी : पंतप्रधान मोदी
या भीषण भूकंपातून झालेल्या मोठ्या प्रमाणातील विध्वंसानंतर जगभरातून चिंता आणि सहवेदनांची लाट उमटली आहे. भारतानेही या आपत्तीबाबत चिंता व्यक्त करत व्हेनेझुएला सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त असून, या कठीण काळात भारत व्हेनेझुएलासोबत ठामपणे उभा असल्याचे सांगितले आहे. तसेच, आवश्यक ती प्रत्येक मदत करण्यासाठी भारत सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









