रेकॉर्ड करा, काय करायचे ते करा, वक्तव्यावरून वाद
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : सत्ताधारी शिंदे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ आणि मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप झाला. कुटुंबाशी संबंधित प्रश्नांवर विचारण्यात आलेल्या मुद्द्यानंतर, त्यांनी पत्रकारांना मारण्याची भाषा करत धमकी दिली. त्याचबरोबर रेकॉर्ड करा, दाखवा, काय करायचे ते करा मी तयार आहे, असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर वाद वाढताना दिसल्यावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना काही प्रश्नांवर उत्तर देताना संजय पाटील यांचा संयम सुटल्याचे दिसून आले. विशेषतः त्यांच्या कुटुंबातील स्थानिक राजकीय हालचालींबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नानंतर ते अधिकच आक्रमक झाले. यावेळी त्यांनी कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना उद्देशून कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आणि काहीवेळा अरेरावीची भाषा वापरल्याचे दिसून आले. घटनेदरम्यान पाटील यांनी मी खासदार आहे, विसरू नका, अशा शब्दांत स्वतःची भूमिका ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच रेकॉर्ड करा, मला फरक पडत नाही, अशा प्रकारच्या वक्तव्यांनी वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. काही क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.
पत्रकारांनी त्यांच्या कन्या आणि ठाकरे गटातील स्थानिक नगरसेविकेच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न विचारल्यानंतर ते वाद अधिक तीव्र झाला. याच प्रश्नावर ते संतप्त झाले आणि त्यांनी आक्रमक पद्धतीने प्रतिक्रिया दिली. या वेळी त्यांनी पत्रकारांना उद्देशून काही धमकीवजा शब्द वापरल्याचेही समोर आले आहे. घटनेच्या व्हिडीओमध्ये पाटील हे वारंवार आपला राग व्यक्त करताना दिसत असून, माझ्या घराजवळ किंवा माझ्याकडे पुन्हा आलात, तर परिणाम वेगळे होतील, अशा आशयाचे वक्तव्य करत असल्याचे स्पष्ट होते. तसेच त्यांनी स्वतः पोलिसांसमोरही आपली भूमिका मांडत असल्याचे सांगत, पत्रकारांना थेट आव्हान दिल्याचे चित्र दिसले. या संवादादरम्यान, काहीवेळा ते पत्रकारांना गाडीत बसून, चर्चा करण्याचे आवाहन करताना, तसेच मी तुमचा मान ठेवतो, पण तुम्ही मर्यादा पाळा, अशा प्रकारचे विधान करतानाही दिसले. मात्र त्याचवेळी त्यांच्या बोलण्यात संताप आणि चिडचिड स्पष्टपणे जाणवत होती. पाटील यांनी यावेळी माध्यमांवरही नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही पत्रकार त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधित मुद्द्यांवर अतिक्रमण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांच्या घरात काही वेळा परवानगीशिवाय प्रवेश झाल्याचा उल्लेख करत त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये या प्रकाराबाबत मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या संतापाला वैयक्तिक कारणे असू शकतात असे म्हटले असले, तरी अनेकांनी सार्वजनिक पदावरील व्यक्तीकडून अशा भाषेचा वापर अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.
संजय दिना पाटील वादावर फडणवीस-शिंदे बैठक
शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्यानंतर, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षानंतर पाटील यांच्या वर्तनात बदल झाल्याचा दावा करत, त्यांच्यावर सत्तेचा आणि पैशाचा माज आल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या बैठकीत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या विषयावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत फडणवीस यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, अशा वक्तव्यांचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला असून, संबंधित खासदारांना योग्य समज देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. तसेच पत्रकारांविषयी अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिल्याचे समजते.
संजय दिना पाटील यांचे राऊतांना प्रत्युत्तर
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रांनंतर, सुरू झालेल्या राजकीय वादावर खासदार संजय दिना पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेत प्रत्युत्तर दिले आहे. मी कोणतीही चूक केलेली नाही, पण जर काही चूक आढळली तर मी चौकशीला पूर्णपणे सामोरे जाण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले.









