लोकवाहिनी न्यूज,मुंबई : आपल्या जादूई आवाजाने अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या, भारतीय संगीत जगतातील अजरामर आवाजाच्या मलिका, स्वरमंजिरी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्या ९२ वर्षांच्या होत्या.
आशा भोसले यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती सातत्याने खालावत जाऊन त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी त्यांच्या निधनाला दुजोरा दिला.
भोसले कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील लोअर परेल येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.










