अहिल्यानगर : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अशोक खरात यांच्या निकटवर्तीय व शिवनेका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ उभ्या कंटेनरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली आणि कार थेट कंटेनरखाली शिरल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात डॉ. जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत प्रवास करत असलेली पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून, दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर, वाहनात अडकलेल्या अवस्थेतून त्यांना बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून महामार्गावरील काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
शेळके हे शिवनेका ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक खरात यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक मानले जात होते. संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये आणि व्यवस्थापनात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे सांगितले जाते. अलीकडच्या काळात ट्रस्टशी संबंधित काही आर्थिक आणि प्रशासकीय मुद्द्यांवरून अंतर्गत मतभेद निर्माण झाल्याची चर्चाही समोर येत होती. काही विश्वस्तांनी राजीनामे दिल्याने संस्थेतील वातावरण तणावपूर्ण असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, अपघातावेळी कार कोण चालवत होते? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कंटेनर महामार्गावर उभा का होता, तसेच अपघात घडण्यामागील नेमकी कारणे काय होती याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी धाव घेऊन बचावकार्य केले. या घटनेनंतर, सामाजिक आणि राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबावर आलेल्या या संकटाने हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपासातून या भीषण अपघातामागील नेमकी कारणे स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








