निदा खानला लपवण्याप्रकरणी मतीन पटेल यांच्या घरी नोटीस
लोकवाहिनी न्यूज,नाशिक : नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला लपवण्यास मदत केल्याच्या प्रकरणी महापालिकेकडून छत्रपती संभाजीनगर येथील नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरांची वैधता तपासण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. जर त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, तर महापालिका नियमानुसार बुलडोझरसह कारवाई करेल, असे महापौर समीर राजूरकर यांनी स्पष्ट केले.
टीसीएस प्रकरणात आरोपी निदा खानला नाशिकमधील मतीन पटेल यांनी नारेगाव येथील त्यांच्या घरी लपवून ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. निदा खानवर लैंगिक छळ व धर्मांतरास प्रोत्साहन देण्याचे आरोप आहेत. यामुळे मतीन पटेल यांना सहआरोपी म्हणून समजण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून मतीन पटेल यांच्या घरी तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने त्यांच्या घरावर नोटीस चिकटवून सांगितले आहे की, त्यांनी घरांची वैधता दर्शवणारी सर्व कागदपत्रे सादर केली नाहीत, तर नियमानुसार बुलडोझरसह कारवाई केली जाईल, असे महापौर समीर राजूरकर यांनी स्पष्ट केले. माहितीनुसार, मतीन पटेलकडे दोन घर आहेत. महापालिकेची तपासणी या घरांच्या वैधतेसाठी असेल. शपथपत्रात या घरांचा उल्लेख आहे का, घराचे कर भरले आहेत का, बांधकाम परवाना आहे का, याची तपासणी केली जाईल. जर कागदपत्रांमध्ये किंवा घरांच्या वैधतेत त्रुटी आढळल्या, तर त्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. तपासणीची कारवाई सोमवारी सुरू झाली असून, मंगळवारी त्यांच्या घरावर प्रत्यक्ष बुलडोझर कारवाईही होऊ शकते. घराशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, त्यांचे नगरसेवक सदस्यत्व रद्द होऊ शकते असे महापौरांनी सांगितले. पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन दोन्हीही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत. दरम्यान, शुक्रवारी व शनिवारी भाजप आणि शिवसेनेचे नेते पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईसंबंधी निवेदन दिले. भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकावर कठोर कारवाई करावी. सध्या प्रशासनाने घराच्या वैधतेची तपासणी सुरू केली असून, मतीन पटेल यांना दोन्ही घरांच्या बाबतीत बाजू मांडण्याची संधी दिली जात आहे. जर ते नियोजित वेळेत कागदपत्रे सादर केली नाहीत किंवा घर अवैध असल्याचे निष्पन्न झाले, तर घरावर त्वरित कारवाई केली जाईल. ■
निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांोबत लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला नाशिक रोड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सोमवारी तिची ५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यामुळे तिला न्यायालयात हजर करण्यात आले होते, जिथे पोलीस तपासाची पुढील कारवाई सुरू ठेवण्यासाठी तिला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यायालयीन सुनावणीपूर्वीच नाशिकरोड कोर्ट परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात होता, कारण प्रकरण अत्यंत संवेदनशील व गंभीर आहे. सुरुवातीला चर्चा अशी होती की निदा खान गरोदर असल्यामुळे तिला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाईल, पण अखेरीस तिला प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी कोर्टात आणले गेले. पोलीस तपासात समोर आले की, निदा खान पीडित कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन धार्मिक विधी करून तिला विशिष्ट धर्माचे पालन करण्यास भाग पाडत होती. तसेच, पीडिताला धार्मिक शिक्षण आणि प्रार्थना करण्यास तसेच विशिष्ट पोशाख स्वीकारण्यासही बंधन घालण्यात आले. तपासात असेही स्पष्ट झाले की, पीडिताला धार्मिक विषयाशी संबंधित तब्बल १७१ लिंक पाठवण्यात आल्या, ज्यातून ऑनलाइन माध्यमातून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या लिंक कुठून पाठवण्यात आल्या, याचा तपास सुरू आहे.








