ऑनलाइन बुकिंग सुविधा | प्रताप सरनाईकांची माहिती
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : खाजगी आराम बससेवांना पर्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात २०० अत्याधुनिक वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये १७० आसनी आणि ३० शयनयान बसेसचा समावेश असेल. प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबत ऑनलाइन तिकीट बुकिंग आणि आधुनिक सुविधा देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सध्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अनेक प्रवासी अधिक भाडे देऊन खाजगी आराम बससेवेला पसंती देतात. वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसने, कमी प्रवासाचा वेळ आणि रात्रीच्या प्रवासासाठी असलेल्या सुविधांमुळे या बससेवेला मागणी आहे. ही बाब लक्षात घेऊन एसटीनेही प्रवाशांना आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा पर्याय देण्याचे नियोजन केले आहे. २५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आणि पाच ते सहा तासांचा प्रवास असलेल्या मार्गांवर आरामदायी ४५ आसनी बसेस चालवण्यात येणार आहेत. दिवसा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या बसचा लाभ घेता येईल. लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या वेळनुसार आणि गरजेनुसार बस निवडता येणार आहे.
नव्या व्होल्वो बसेससाठी ऑनलाइन तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाइन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खाजगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही तिकीट बुक करता येण्याची सुविधा देण्याचा विचार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी बसस्थानकावर जाण्याची गरज राहणार नाही. मोबाइलवरून बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या तिकीट आरक्षित करता येणार आहे. नव्या बसेसमध्ये प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी आतिथ्य व्यवस्थापनात खाजगी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. प्रवाशांचे स्वागत, बसमधील स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि आवश्यक माहिती देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल. त्यामुळे एसटीच्या पारंपरिक सेवेसोबत आधुनिक ग्राहकसेवेवरही भर दिला जाणार आहे.
व्होल्वो आणि शयनयान बसेस कोणत्या मार्गावर सुरू करायच्या, यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. प्रवाशांची संख्या, मार्गावरील मागणी, अंतर, प्रवासाचा कालावधी, उपलब्ध बससेवा आणि आर्थिक व्यवहार्यता या बाबींचा विचार केला जाईल. महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य मार्गावरील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मार्ग निश्चित केले जाणार आहेत. एसटीचे राज्यभर मोठे जाळे असून, ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांचा महामंडळावर विश्वास आहे. या विश्वासाला आधुनिक सुविधा आणि डिजिटल सेवांची जोड देऊन लांब पल्ल्याची प्रवासी सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. २०० व्होल्वो बसेस सुरू झाल्यानंतर प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खाजगी आराम बससेवांच्या तुलनेत एसटीची लांब पल्ल्याची सेवा अधिक सोयीची करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे













