विधान परिषदेत नव्या चेहऱ्यांची एन्ट्री
लोकवाहिनी न्यूज,मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेवर नुकत्याच बिनविरोध निवडून आलेल्या दहा नवनिर्वाचित सदस्यांचा गुरुवारी (१४ मे) विधान भवनात शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात सर्व सदस्यांनी ‘मी ईश्वर साक्ष ठेवून’ अशी शपथ घेत आपल्या नव्या राजकीय प्रवासाची अधिकृत सुरुवात केली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्व सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला राज्यातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
विधान परिषद निवडणुकीत विधानसभा सदस्यांद्वारे निवडून आलेल्या नऊ सदस्यांसोबतच पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रज्ञा सातव यांचाही यात समावेश होता. भाजप कडून प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांनी शपथ घेतली. शिवसेना (शिंदे गट) कडून डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी सदस्यत्व स्वीकारले. शिवसेना (ठाकरे गट) चे नेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी विधान भवन परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सलग पाचव्यांदा विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली, त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या. दीर्घ राजकीय अनुभव आणि विधान परिषदेतील सक्रिय भूमिका यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष लागले आहे.









