जयपूर : राजस्थानमधील वरिष्ठ सनदी अधिकारी शिखर अग्रवाल यांच्या कुटुंबाने अवघ्या अडीच वर्षांत एका रिसॉर्ट कंपनीकडून तब्बल ६४ बंगले (व्हिला आणि कॉटेज) खरेदी केल्याचे प्रकरण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे। विशेष म्हणजे, जाहिरात पुस्तिकेत ५१ लाख रुपये किंमत असलेला बंगला केवळ ११ लाख रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केल्यानंतर अग्रवाल यांनी राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली होती। मात्र, न्यायालयाने एसीबीच्या तपासाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळली आहे। त्यामुळे या प्रकरणातील तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे।
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, एसीबीने गुन्हा दाखल करण्याच्या काही आठवडे आधीच अग्रवाल यांच्या मुलांनी जयपूर येथील अनंता रिसॉर्टमध्ये २४ बंगले (व्हिला) खरेदी केल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे। हे बंगले एकूण २.६४ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले। म्हणजेच, प्रत्येक व्हिलाची किंमत अवघी ११ लाख रुपये ठरली। मात्र, त्याच आकाराच्या व्हिलाची रिसॉर्टच्या जाहिरात पुस्तिकेतील किंमत ५१ लाख रुपये असल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे। या मोठ्या किंमत फरकामुळे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत।















