पेपरफुटी, कोचिंग माफिया आणि गोंधळ
लोकवाहिनी न्यूज,मुंबई : देशभरात वैद्यकीय शिक्षणासाठी घेतली जाणारी ‘नीट’ परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. नीट परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, ही परीक्षा राज्यांवर लादली गेल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच महाराष्ट्र सरकारने दक्षिणेकडील राज्यांसोबत उभे राहत याविरोधात ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आपल्याला नीट परीक्षा नको आहे. महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजेसमध्ये मराठी विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळत नसेल, तर अशा व्यवस्थेचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नीट परीक्षेच्या पेपरफुटीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, काही ठिकाणी हा पेपर लाखो रुपयांना विकला गेला. या प्रकरणाची मुळे महाराष्ट्रात सापडली असली तरी, हे संपूर्ण देशभर पसरलेले जाळे आहे. काही कोचिंग क्लासेसचाही यात सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने परीक्षा रद्द करून सीबीआय चौकशी जाहीर केली, मात्र यापूर्वीही अशाच चौकश्या होऊन काहीच निष्पन्न झाले नाही, असे ते म्हणाले. या गोंधळामुळे २२ लाख विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे भविष्य टांगणीला लागले आहे, याची सरकारला जाणीव नसल्याची टीका त्यांनी केली. २०१६ मध्ये नीट लागू करतानाच आपण विरोध केला होता, कारण या परीक्षेमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांना आणि महागड्या कोचिंग क्लासेसना फायदा होणार हे स्पष्ट दिसत होते, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या मेडिकल सीट्सवर डल्ला
राज ठाकरे यांनी दक्षिण भारतातील राज्यांचाही उल्लेख केला. तामिळनाडूसह अनेक राज्यांनी सुरुवातीपासून नीटला विरोध केला आहे. दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मेडिकल कॉलेजेस असल्याने उत्तर भारतातील विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळावा यासाठीच ही परीक्षा आणली गेली, असा आरोप त्यांनी केला. उत्तरेकडील राज्यांमध्ये कोचिंग क्लासेसचे मोठे जाळे असून, त्याचा परीक्षेवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी म्हटले. पूर्वी प्रत्येक राज्याची स्वतंत्र वैद्यकीय प्रवेश परीक्षा होती किंवा बारावीच्या गुणांवर प्रवेश दिला जात होता. त्या व्यवस्थेत काही त्रुटी असतील, तरी त्या सुधारण्याऐवजी आणलेली नीट परीक्षा अधिकच वादग्रस्त ठरल्याचे त्यांनी सांगितले. काही विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळणे, ग्रेस मार्क्स देणे यांसारख्या घटनांमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे ते म्हणाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात सतत नीटमध्ये गोंधळ होत असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. पंतप्रधानांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारलाही लक्ष्य केले.








