पहिल्याच दिवशी मनपा शाळेत जंगी स्वागत
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा नवा उत्साह आणि किलबिलाट पाहायला मिळाला. शाळेच्या पहिल्या दिवशी ‘प्रवेशोत्सव’ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांवर पुष्पवर्षाव करण्यात आला, तसेच नवीन पुस्तके व शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आली. या जंगी स्वागतामुळे विद्यार्थी भारावले. एका नव्या उर्जेसह मनपा शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची दणक्यात सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते पाटी पुजा करण्यात आली.
‘शाळा प्रवेशोत्सवा’चा मुख्य कार्यक्रम कळमना डिटी सिग्नल येथील पीएम संजयनगर हिंदी प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आला. मनपा आयुक्त डॉ. विपिन इटणकर यांनी यांनी डिटी सिग्नल येथील पीएम संजयनगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात भाग घेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम, शिक्षण सभापती संतोष देवी लड्डा, कर आकारणी व कर संकलन समिती सभापती सरिता कावरे, नगरसेविका कु. दुर्गेश्वरी कोसेकर, नगरसेवक अरुण हारोडे, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी माधुरी काटकर, मुख्याध्यापक गिता दांडेकर यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
पीएम संजयनगर हिंदी प्राथमिक व माध्यमिक शाळेत डॉ. इटणकर, मुरुगानंथम, संतोष देवी लड्डा, सरिता कावरे यांच्या हस्ते पाचवी तसेच बालवाडीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
नागपूर महानगरपालिकेतर्फे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांसाठी अविस्मरणीय ठरावा, विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची हुरहुर लागावी, शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा यासाठी मनपाच्या ८४ प्राथमिक व २८ माध्यमिक अशा एकूण ११२ शाळांमध्ये शाळेचा पहिला दिवस ‘प्रवेशोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. या शाळांमध्ये एकूण १३ हजार ११२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
संतोषदेवी लड्डा यांनी पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करून त्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मनपा शाळांमध्ये गुणवत्तेची वाढ करण्यासोबतच शाळेची सुरक्षा, बालवाडीत शिकणाऱ्या मुलांसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि इतर पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, मनपाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह अधिकाऱ्यांच्या चांगल्या आणि आधुनिक सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी डॉ. इटणकर यांनी सांगितले की, मनपाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने, शहरातील मैदाने आणि उद्यानांच्या धर्तीवरच पुढील शैक्षणिक सत्रापर्यंत मनपाच्या सर्व शाळांचा कायापालट करण्यात येईल. शाळेत आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा व खाजगी शाळांच्या धर्तीवर इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, तसेच शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या क्रीडा, कौशल्य विकास आणि परदेशी भाषेचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे खाजगी शाळांच्या स्पर्धेत मनपा शाळा कुठेही कमी पडणार नाहीत. भविष्यात मनपा शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांच्या रांगा लागतील, अशा पद्धतीने शाळांचा विकास करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शासकीय शाळा आणि महाविद्यालयांतून शिक्षण घेऊन अनेक जण मोठे अधिकारी झाले आहेत. त्यामुळे शासकीय शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही आमची मोठी जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. खाजगी शाळांच्या तुलनेत शासकीय शाळांमधील शिक्षकांची गुणवत्ता अधिक चांगली असते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पूरक वातावरण मिळाले, तर ते खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा कुठेही मागे पडणार नाहीत, उलट त्यांना तगडी टक्कर देऊ शकतील. कमी सुविधा असतानाही जर आपले विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, तर अधिक सुविधा मिळाल्यास ते प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवतील, असा विश्वास मनपा आयुक्त डॉ. विपिन यांनी व्यक्त केला.
काढली सेल्फी
शैक्षणिक आयुष्यातील हा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी आठवण म्हणून पीएम संजय नगर शाळेत सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले होते. यावेळी यावेळी डॉ. इटणकर, मुरुगानंथम, संतोष देवी लड्डा, सरिता कावरे, कु. दुर्गेश्वरी कोसेकर यांनी विद्यार्थ्यांसह सेल्फी काढली.









