विधानपरिषदेवर झिशान सिद्दीकींना संधी दिल्याने नाराज
लोकवाहिनी न्यूज,ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ता आणि ठाणे-पालघर समन्वयक आनंद परांजपे यांनी पक्षातील सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवत आपला राजीनामा सादर केला. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्या पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच पक्षात नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता आनंद परांजपे यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा समोर आली आहे.
आनंद परांजपे यांनी आपल्या राजीनामा पत्रात, पक्षाने माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या, त्याबद्दल मी आभारी आहे. मात्र मी सरचिटणीस, प्रवक्ता, ठाणे-पालघर समन्वयक आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे म्हटले आहे. त्यांनी अतिशय थोडक्यात आणि चार ओळींच्या पत्रातून पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीनंतर परांजपे नाराज असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होती. अखेर पक्षाने झिशान सिद्दीकी यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यानंतर परांजपे यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात होते. यापूर्वी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतही त्यांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळेच त्यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे








