संयुक्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृवात आंदोलनास सुरुवात
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आंदोलनास गुरुवारपासून सुरुवात केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संयुक्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात सुरू झालेल्या आंदोलनात सर्व कर्मचारी काळ्याफिती लावून सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करीत आपल्या मागण्या रेटून धरल्या.
काळ्याफिती लावून विद्यापीठाच्या सर्व विभागातील कर्मचारी कामकाज करीत असताना दिसून आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संयुक्त कर्मचारी कृती समितीने केलेल्या आवाहनाला जमनालाल बजाज प्रशासकीय परिसरातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनात सहभाग घेतला आहे; हीच परिस्थिती विद्यापीठाच्या सर्व विभागांमध्ये दिसून आली.
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमध्ये कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघांतर्फे शासन स्तरावर वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आलेली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत सदर मागण्यांवर शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. सदर बाबीमुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यांच्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या दि. २७ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला.









