नवजात बालकांना झटपट हलविल्याने मोठी दुर्घटना टळली
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : नागपुरातील डागा शासकीय स्त्री रुग्णालय येथील नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एनआयसीयू/एसएनसीयू) गुरुवारी आग लागल्याने एकच खळबळ उडाली. घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तेथील नवजात बालकांना झटपट इतर वार्डसह मेयो रुग्णालयातही हलवले.
प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर संपूर्ण विभागात धूर पसरल्याने रुग्णालय प्रशासन, डॉक्टर, परिचारिका आणि नवजात बालकांच्या पालकांमध्ये घबराट निर्माण झाली. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. त्यावेळी नवजात अतिदक्षता विभागात सुमारे ३८ बालकांवर उपचार सुरू होते. धूर पसरताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने सतर्कता बाळगत बचावकार्य सुरू केले. डॉक्टर आणि परिचारिका कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सर्वच नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढले. काही बालकांना डागा रुग्णालयातील इतर विभागात हलविण्यात आले, तर काहींना खबरदारीचा उपाय म्हणून मेयो रुग्णालय येथे स्थलांतरित करण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वेळीच सर्व बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार अचानक धूर पसरल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणि रुग्णालय प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. आग लागण्याच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.








