लोकवाहिनी न्यूज:मुंबई। देशभरात वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच भारतीय हवामान विभागाने दिलेली एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाचा नैऋत्य मान्सून नेहमीपेक्षा लवकर केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २६ मे रोजी मान्सून केरळात पोहोचू शकतो. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. १६ मेच्या सुमारास मान्सून अंदमान परिसरात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हालचालींमुळे मान्सूनचा पुढील प्रवास वेगाने होण्याचे संकेत मिळत आहेत.
५ जूनपर्यंत मान्सून गोव्यात
अंदाजानुसार, ५ जूनपर्यंत मान्सून गोव्यात दाखल होऊ शकतो, तर ६ जूनपर्यंत तो कोकण किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर ७ जूनपर्यंत पुण्यासह राज्यातील काही भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, माहे आणि दक्षिण कर्नाटकातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. किनारपट्टी भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल.









