पुराव्यामुळे सत्र न्यायालयाने ठरविले दोषी
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करून १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाने जयेश पुजारीसह दोन आरोपींना दोषी ठरवत पाच वर्षांपर्यंतच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार के. शर्मा यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. जयेश उर्फ जयेशकांत उर्फ शाहीर उर्फ शाकीर पुजारी आणि अफसर पाशा उर्फ बशीरउद्दीन उर्फ खुशिउद्दीन मोहम्मद अशी दोषी ठरलेल्या आरोपींची नावे आहेत.
मोहम्मद शाकीर हा आरोपी फरार असून त्याच्याविरोधात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २९९ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. धंतोली पोलिसांनी २०२३ मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. तपासानुसार, आरोपींनी कर्नाटकातील हिंडलगा केंद्रीय कारागृहातून विविध मोबाईल क्रमांकांचा वापर करून नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या लँडलाईनवर धमकीचे कॉल केले. आरोपींनी १०० कोटी खंडणीची मागणी केली होती. रक्कम न दिल्यास बॉम्बस्फोट घडवून आणण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड विधानाच्या कलम ३८५, ३८७, ५०६(२), ५०७ तसेच यूएपीएच्या कलम १०, १३(१) आणि १८ अंतर्गत दोषी ठरवले. विविध कलमांखाली दोन ते पाच वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या आहेत. विशेष सरकारी अभियोक्ता वेदिका पाटील यांनी कामकाज पाहिले.
प्रतिबंधित संघटनांशी संबंधाचा आरोप
पुजारी याच्याकडून सिमकार्ड जप्त करण्यात आले. भ्रमणध्वनी पडताळणीत ‘तालिबान झिंदाबाद’ सह विविध आक्षेपार्ह स्वरूपाचे संदेश आढळल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला. तसेच आरोपींचे ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) आणि ‘डी-गँग’ सारख्या प्रतिबंधित संघटनांशी संबंध असल्याचेही समोर आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तांत्रिक पुरावे, सीडीआर, इलेक्ट्रॉनिक पुरावे, बँक व्यवहार आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे सरकार पक्षाने आरोप सिद्ध केल्याचे न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणात एकूण ६४ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.
गर्लफ्रेंडच्या मदतीने मिळविला होता मोबाईल नंबर
मुख्य आरोपी जयेश पुजारी याला त्याच्या गर्लफ्रेंडच्या मदतीने गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा मोबाईल नंबर मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. साक्षीदार मंजुळाने सत्र न्यायालयात दिलेल्या साक्षीत हा संपूर्ण प्रकार उघड केला. मंजुळाने सांगितले की, जयेश पुजारीने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवत तिच्याशी जवळीक वाढवली होती. त्याने तिचा विश्वास संपादन केल्यानंतर तिच्याकडून गडकरी यांच्या कार्यालयाचा मोबाईल नंबर मिळवला. इतकेच नव्हे, तर तिच्या सांगण्यावरून गडकरी यांच्या कार्यालयातील आणखी एक संपर्क क्रमांकही त्याला मिळाला होता. ही माहिती तिने न्यायालयात स्पष्टपणे दिली.








