चुलबंद नदीवरील भुगाव-विहिरगाव पूलवजा बंधाऱ्यामुळे शेतीला संजीवनी अवघ्या ४.५ कोटींत पाणी साठवण आणि सिंचनाचा नवा मार्ग
लोकवाहिनी न्यूज
भंडारा : राज्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट गडद होत असताना दुसरीकडे जलसंधारणाच्या छोट्या, पण दूरदृष्टीपूर्ण कामामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची क्षमता अधोरेखित होत आहे. भंडारा जिल्ह्यातील चुलबंद नदीवर पूर्ण झालेला भुगाव-विहिरगाव पूलवजा बंधारा हे त्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे. अवघ्या साडे चार कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे ५९३ टी सी एम पाणीसाठा निर्माण होण्यासोबतच जवळपास २९९ हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्याची क्षमता निर्माण झाली आहे. जलसंधारण विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अनंत जगताप यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या नावीन्यपूर्ण कामाचा फायदा आज प्रत्यक्षात दिसून येत आहे.
चुलबंद नदीवरील भुगाव-विहिरगाव पूलवजा बंधाऱ्याची लांबी १६८ मीटर असून, या बंधाऱ्यावर नदीच्या प्रवाहाला नियंत्रित करून पाणी अडविण्याची व्यवस्था करण्यात आल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होण्यास मदत होणार आहे. या बंधाऱ्यात ३.०० मी उंचीची लोखंडी द्वारे लावल्यानंतर चुलबंद नदीच्या पात्रात जवळपास ६ ते ७ किलोमीटर अंतरापर्यंत पाणी साठून राहील. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास, परिसरातील विहिरींना पाणी उपलब्ध होण्यास आणि सिंचनासाठी आवश्यक पाण्याचा स्रोत निर्माण होण्यास मदत होणार आहे.














