सुखोई-३०च्या फ्लाय पास्टने वाढवला रोमांच, भारतीय वायुसेनेच्या एअर फेस्टचा उत्साहात समारोप
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्य, शिस्त आणि कौशल्याचे दर्शन घडविणाऱ्या एअर फेस्टचे रविवारी नागपुरात मोठ्या उत्साहात समारोप झाले. एअर वॉरियर ड्रिल टीमच्या शिस्तबद्ध कवायतींनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वायुसेनेच्या जवानांनी सलामी दिली. त्यानंतर सारंग आणि सूर्यकिरण या नामांकित हवाई कसरत पथकांसह सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाच्या फ्लाय पास्टने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आकाशात साकारलेल्या विविध हवाई रचना, हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती आणि लढाऊ विमानांच्या वेगवान उड्डाणामुळे नागपूरकरांना भारतीय वायुसेनेच्या हवाई सामर्थ्याची झलक अनुभवता आली.
या फेस्टमध्ये सारंग हेलिकॉप्टर प्रात्यक्षिक पथकाच्या पाच ध्रुव हेलिकॉप्टरनी आकाशात विविध आकर्षक रचना साकारल्या. वेगवेगळ्या पद्धतीने आकाशात रचना साकारत हेलिकॉप्टरनी केलेल्या कसरती प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरल्या. विशेष म्हणजे, सारंग पथकात चार महिला वैमानिकांचा समावेश आहे.
सूर्यकिरण हवाई कसरत पथकाच्या नऊ विमानांनी आकाशात विविध हवाई रचना साकारत प्रात्यक्षिके केली. या पथकात १३ वैमानिक होते. एकाच वेळी अनेक विमाने विशिष्ट रचनेतून मार्गक्रमण करताना त्यांच्यातील अचूक अंतर, वेग आणि समन्वय यांचा प्रत्यय आला. विमानांच्या वेगवान हालचाली आणि आकाशात साकारलेल्या आकर्षक रचनांनी उपस्थितांना थक्क केले.
सारंग आणि सूर्यकिरणच्या प्रात्यक्षिकांनंतर सुखोई लढाऊ विमानानेही फ्लाय पास्ट केले. विमानांच्या वेगवान उड्डाणामुळे निर्माण झालेल्या आवाजाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले.
एअर फेस्टमध्ये सारंग आणि सूर्यकिरण पथकांबरोबरच वायुसेनेच्या अन्य सामर्थ्यांचेही दर्शन घडविण्यात आले. सुखोई-३० एमकेआय या अत्याधुनिक लढाऊ विमानाचे प्रात्यक्षिक, आकाश गंगा स्कायडायव्हिंग पथकाचे पॅराशूटद्वारे सादरीकरण आणि गरुड विशेष दलाची प्रात्यक्षिके ही या महोत्सवाची प्रमुख आकर्षणे आहेत. २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी आयोजित या दोन दिवसीय एअर फेस्टमधून नागपूरकरांना भारतीय वायुसेनेचे सामर्थ्य, तंत्रज्ञान, कौशल्य आणि शिस्त जवळून अनुभवण्याची संधी मिळाली.
वायुसेनेनगरमधील कार्यक्रमासाठी निमंत्रितांनाच प्रवेश असल्याने फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव परिसरासह दाभा, वाडी आणि आसपासच्या भागांत नागरिकांनी घरांच्या गच्च्यांवरून प्रात्यक्षिके पाहिली. मोबाइलमधून छायाचित्रे आणि चिरफिरी टिप्पणींची लगबग सुरू होती. ढगाळ वातावरणामुळे काही वेळा विमाने नजरेआड होत होती; मात्र पुन्हा दिसताच नागरिकांचा उत्साह वाढत होता.














