लोकवाहिनी न्यूज
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात विविध समस्या, अडचणींच्या निवेदनांसोबत नेहमीच समाजोपयोगी नावीन्यपूर्ण कल्पनाही मांडल्या जातात. यंदाच्या जनसंपर्क कार्यक्रमातही बाईक अॅम्ब्युलन्सचे प्रात्यक्षिक गडकरींना दाखविण्यात आले. याशिवाय नागरिकांनी गडकरी वाडा येथे मोठ्या संख्येने जनसंपर्क कार्यक्रमाला हजेरी लावत गडकरी यांना आपल्या मागण्यांची निवेदने सादर केली.
डीआरडीओ विकसित बाईक अॅम्ब्युलन्सला ‘रक्षिता’ असे नाव देण्यात आले आहे. अरुंद रस्ते आणि गर्दीच्या वस्त्यांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने ही अभिनव संकल्पना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गडकरी यांनी संबंधित उपक्रमाची माहिती देणारे प्रशांत अरोरा यांचे कौतुक केले. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस यांनी विकसित केलेल्या या बाईक अॅम्ब्युलन्समधून रुग्णाला सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी विशेष आसनव्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्सिजन पुरवठा, प्रथमोपचार साहित्य, स्प्लिंट्स, हेड इमोबिलायझर तसेच रुग्णाच्या महत्त्वाच्या शारीरिक स्थितीचे निरीक्षण करणारी यंत्रणा यात उपलब्ध आहे. रुग्णाच्या प्रकृतीविषयक माहितीचे ब्लूटूथद्वारे जवळच्या रुग्णालयापर्यंत प्रसारण करण्याची सुविधाही आहे. अरुंद रस्ते, गर्दीच्या वस्त्या आणि दुर्गम भागांत पारंपरिक रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्यास ही बाईक अॅम्ब्युलन्स उपयुक्त ठरू शकते. केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून या बाईक अॅम्ब्युलन्सचा वापरही करण्यात येत आहे, अशी माहिती गडकरी यांना देण्यात आली.
दरम्यान, जनसंपर्क कार्यक्रमात विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींनी तसेच नागरिकांनी गडकरी यांची भेट घेऊन विविध मागण्यांची निवेदने सादर केली. स्थानिक समस्या, विकासकामे आणि सार्वजनिक सुविधांसंदर्भातील मागण्यांच्या निवेदनांचा यामध्ये समावेश होता. संबंधित विषयांकडे लक्ष वेधून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली. याशिवाय, यापूर्वी सादर केलेल्या मागण्यांनुसार कामे मार्गी लागल्याबद्दल काही नागरिक आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी गडकरी यांची भेट घेऊन आभार मानले. विकासकामांमुळे नागरिकांना झालेल्या लाभाची माहितीही त्यांनी यावेळी दिली.















