२५ एकर शेती, घरदार असूनही मायभूमीत परतण्याचे धाडस नाही : पोलिस संरक्षणात अहेरीत जगतेय साईनाथ नरोटीचे कुटुंब
लोकवाहिनी न्यूज
अहेरी : नक्षलवादाचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र असले, तरी नक्षली हिंसाचाराच्या जखमा अद्याप भरलेल्या नाहीत. स्वतःची २५ एकर शेती, घरदार असूनही एका कुटुंबाला आजही मायभूमीत परतण्याचे धाडस होत नाही. तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या साईनाथ नरोटीच्या कुटुंबावर आजही भीतीच्या सावटाखाली जगण्याची वेळ आली आहे. शासनाची आर्थिक मदत मिळाली, आरोपींवर कारवाईही झाली; मात्र कुटुंबाच्या मनातील दहशत कायम आहे. अहेरीत पोलिसांच्या संरक्षणात जगणाऱ्या या कुटुंबाची व्यथा नक्षलमुक्तीच्या घोषणांपलीकडे नक्षलपीडितांच्या पुनर्वसनाचे वास्तव अधोरेखित करणारी आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मर्दहूर हे साईनाथ नरोटी यांचे मूळ गाव. साईनाथ गडचिरोली शहरात राहून बीएच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता. सोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करून भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहत होता. पोलिस भरती प्रक्रियेतही त्याने सहभाग घेतला होता. हिंसाचाराच्या सावटाखालील भागातून बाहेर पडून शिक्षण, नोकरी आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा त्याचा प्रयत्न होता. होळी सणानिमित्त तो आपल्या मर्दहूर या गावी आला होता. मात्र, मुख्य प्रवाहात येण्याचा त्याचा हाच प्रयत्न नक्षलवाद्यांच्या रोषाचे कारण ठरला.
साईनाथने कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करायला हवी होती, त्याच वयात त्याची जीवनयात्रा संपविण्यात आली.
तबब्ल २५ एकर शेती असूनही दुसऱ्याच्या शेतात मजुरी
नरोटी कुटुंब आज अहेरी येथे पोलिसांच्या संरक्षणात वास्तव्याला आहे. मर्दहूर येथे त्यांचे घर आहे, २५ एकर शेती आहे; मात्र या मालमत्तेचा उपभोग घेण्यासाठी गावात परतण्याचे धाडस त्यांच्यात नाही. कुटुंबाला मिळालेली आठ लाख रुपयांची मदत जगण्याच्या गरजा भागविण्यात खर्च झाली. दुसरीकडे, कुटुंबातील इतर मुलांना उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करावी लागत आहे.
आरोपींवर कारवाई; मात्र कुटुंबाच्या आयुष्याचे काय ?
साईनाथच्या हत्येनंतर गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकाने (सी-६०) या प्रकरणाचा तपास सुरू केला. १६ मार्च २०२३ रोजी पोलिसांनी सापळा रचून या हत्येतील मुख्य आरोपी प्रकाश उर्फ देविदास उर्फ आडवे मुरे गावडे याला अटक केली. त्याच्यावर खून, चकमक आणि जाळपोळ यांसारखे अनेक गुन्हे दाखल होते. या हत्येतील आणखी एक प्रमुख आरोपी बिटलु मडावी हा मे २०२३ मध्ये गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली. शासनाने पीडित कुटुंबाला आठ लाख रुपयांची आर्थिक मदतही दिली. मात्र, या कारवाईने साईनाथ परत येणार नव्हता आणि आर्थिक मदतीने उद्ध्वस्त झालेले कुटुंब पूर्वपदावर येणार नव्हते. त्याहून गंभीर बाब म्हणजे साईनाथच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या नशली दहशतीमुळे त्याच्या आई-वडिलांसह भावंडांना मर्दहूर गाव सोडावे लागले. गावातीलच नक्षलवाद्याने साईनाथची हत्या केल्याने गावकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भीतीच्या सावटाखाली नरोटी कुटुंबाला आपल्या जन्मगावातून स्थलांतर करावे लागले.













