कोलकाताला जाणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून घेतले ताब्यात
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : पुणे येथील हडपसर परिसरातल्या उषाकिरण रुग्णालयात बॉम्ब ठेवल्या प्रकरणात नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने एकाला रेल्वे स्थानकावरून अटक केली. शिवाजी राठोड असे दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पुण्यात बॉम्ब ठेवल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर राठोड हा हावडा एक्स्प्रेसने कोलकाता येथे पळून जात होता, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावर तीन रेल्वे गाड्यांची तपासणी केली. यात शालिमार एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना राठोड दहशतवाद विरोधी पथकाच्या हाती लागला. राठोड हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
पुणे येथील हडपसर भागातील उषाकिरण नावाच्या रुग्णालयात कमी दर्जाची बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्यानंतर राठोडने पुणे-कोलकाता दरम्यान धावणारी शालिमार एक्स्प्रेस रेल्वे पकडली होती. दरम्यान पुणे पोलिसांनी माहिती दिल्यानंतर नागपूर येथील दहशतवाद विरोधी पथकाने पश्चिम बंगालच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी केली.
नेमकं प्रकरण काय?
बुधवारी सायंकाळी हडपसरमधील कामधेनु इस्टेट परिसरात असलेल्या उषाकिरण रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ संशयास्पद बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस, बॉम्बशोधक पथक, अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. परिसर तातडीने सील करण्यात आला आणि रुग्णालय परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले. तपासादरम्यान ती वस्तू जिवंत आयईडी असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, बॉम्ब निकामी पथकाने वेळीच कारवाई करत संभाव्य मोठी दुर्घटना टाळली.
गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती?
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एटीएस आणि गुप्तचर यंत्रणा तपासात सहभागी झाल्या होत्या. तपासासाठी परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. संशयास्पद हालचालींच्या आधारे अनेकांची चौकशी करण्यात आली. तांत्रिक पुरावे आणि फुटेजच्या आधारे तपास यंत्रणा आरोपीपर्यंत पोहोचल्या आणि त्याचे लोकेशन नागपूरमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत असली, तरी याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठे पोहोचतात, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.









