लोकवाहिनी न्यूज,नागपूर : चंद्रपूरमध्ये उघडकीस आलेल्या बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रवींद्र पाल सिंह यांना सर्वोच्च न्यायालयातून मोठा धक्का बसला आहे. अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेले दोन्ही अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू आहे.
दिल्ली येथील डॉ. रवींद्र पाल सिंह यांनी उच्च न्यायालयाच्या त्या आदेशाला आव्हान दिले होते, ज्यामध्ये त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ग्राह्य धरता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत डॉ. सिंह यांनी नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे स्पष्ट केले. दुसऱ्या अर्जात त्यांनी दोषारोपपत्र रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच आरोपपत्र आणि पुढील खटल्याच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याची अंतरिम विनंतीही करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही मागणी यापूर्वीच फेटाळली होती आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. खंडपीठाने निरीक्षण नोंदविले की, हा बहुराज्यीय आणि सीमापार स्वरूपाचा तपास असून त्यामध्ये अनेक आरोपींचा सहभाग आहे. या प्रकरणातील दोन नामांकित डॉक्टरांची अटक दीर्घकाळ टळल्याचाही उल्लेख सुनावणीदरम्यान करण्यात आला.
आरोपींविरोधात ठोस पुरावे उपलब्ध असून आरोपपत्र सुमारे सात हजार पानांचे असल्याची माहितीही न्यायालयासमोर मांडण्यात आली. न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्यासमोर या खटल्यावर सुनावणी झाली.








