लोकनेत्यांविरुद्ध पर्यावरण प्रेमींचा हुंकार
लोकवाहिनी न्यूज:नागपूर: लंडन स्ट्रीट आणि आमराई परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या निषेधार्थ रविवार, २४ मे रोजी सकाळी साडेसात वाजता मॉर्निंग योगा ग्रुपसह विविध सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी आणि जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने मानवी साखळी आंदोलन केले. लंडन स्ट्रीट परिसरात झालेल्या या आंदोलनाने संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला.
“देवा भाऊ वृक्ष नका खाऊ”, “गडकरी काका वृक्ष तोडू नका” अशा घोषणांनी नागरिकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्याऐवजी पर्यायी मार्गांचा विचार करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या वेळी नागरिकांनी वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे नव्हे तर भविष्यातील पिढ्यांच्या श्वासाचे आधार असल्याचे सांगितले. वाढते तापमान, प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शहरातील हिरवळ टिकवणे अत्यंत गरजेचे असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
मानवी साखळी आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडले. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान अनेकांनी हातात फलक घेऊन वृक्ष संवर्धनाचे संदेश दिले.
यावेळी उपस्थित पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाला आवाहन करताना सांगितले की, नागपूर शहराच्या सौंदर्यात आणि पर्यावरणीय संतुलनात लंडन स्ट्रीट व आमराई परिसरातील वृक्षांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे विकासकामे करताना पर्यावरणाचा समतोल राखून निर्णय घेणे आवश्यक आहे. या आंदोलनामुळे परिसरात पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांनी वृक्षतोडीविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.









