मराठी चित्रपटसृष्टीत वास्तववादी आणि धाडसी विषय हाताळणाऱ्या चित्रपटांची परंपरा कायम राहिली असून, अशाच धक्कादायक आणि चर्चेत असलेल्या विषयावर आधारित महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स हा आगामी चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला असून, नुकताच या चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून, सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपटाच्या नावापासूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. आता सगळं उघड होणार…! ही टॅगलाईन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून, या सिनेमातून समाजातील काही प्रभावशाली व्यक्तींचे कथित गुपित व्यवहार, ढोंगीपणा आणि सत्तेच्या जोरावर सुरू असलेले प्रकार उघड केले जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, मोशन पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेल्या अनेक प्रतीकात्मक गोष्टींमुळे हा चित्रपट एका गाजलेल्या भोंदूबाबा प्रकरणाशी संबंधित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोस्टरमध्ये एका व्यक्तीची पाठमोरी आकृती दाखवण्यात आली आहे. या व्यक्तीने साधा कुर्ता-पायजमा आणि जॅकेट असा सभ्यतेचा आव आणणारा पोशाख घातलेला आहे. मात्र, त्याच्या मागे लपवलेल्या हातात पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल दिसतात. सभोवताली गुन्हेगारी तपास दर्शवणाऱ्या पिवळ्या टेप्स, भिंतीवर लावलेले संशयास्पद फोटो, प्रश्नचिन्हे आणि काही गूढ संकेत दिसत आहेत. नाशिक आणि भोंदूबाबा असे शब्दही पोस्टरमध्ये झळकताना दिसत असल्याने हा चित्रपट नेमका कोणावर भाष्य करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पोस्टरमधील आणखी एक विशेष बाब म्हणजे टेबलावर ठेवलेले काही वस्तूंचे तपशील. एका बाजूला तांब्याचे पाणी ठेवण्याचे भांडे, तर दुसऱ्या बाजूला धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रतिमा निर्माण करणारी पुस्तके, चहाचा ग्लास आणि मद्याची बाटली ठेवलेली दिसते.
हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा मोशन पोस्टरद्वारे करण्यात आली आहे. गांधी जयंतीच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्यामागेही काही प्रतीकात्मक संदेश असल्याचेही चर्चा रंगू लागली आहे. भ्रष्टाचार, ढोंगीपणा आणि समाजातील दुटप्पी चेहऱ्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.










