१४ ऑगस्ट २०२६ रोजी होणार प्रदर्शित
बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असताना निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचे नाव बदलून बंटवारा १९४७ करण्यात आले असून, तो १४ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
यापूर्वी या चित्रपटाचे नाव लाहोर १९४७ असे होते. सनी देओलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मोशन पोस्टर शेअर करत, ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. पोस्टर शेअर करताना सनी देओलने एक खास संदेशही दिला. द्वेष आणि भीतीचा काळ त्याने धाडसाची निवड केली, असे कॅप्शन त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती बॉलिवूडचा सुपरस्टार आमीर खान करत आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. बंटवारा १९४७ मध्ये सनी देओलसोबत अभिनेत्री प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रिती झिंटा अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याने तिचे चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय शबाना आझमी, अली फझल आणि करण देओल यांचीही महत्त्वाची भूमिका चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचे नाव बदलण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. बंटवारा या नावाचे हक्क दिवंगत निर्माता सलीम अख्तर यांच्या कुटुंबाकडे होते. आमीर खान यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन हे नाव वापरण्याची परवानगी मिळवली. त्यानंतर चित्रपटाचे नाव अधिकृतपणे बदलण्यात आले. चित्रपटाच्या नावावरून आणि पोस्टरवरून ही कथा भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे दिसून येते. देशाच्या इतिहासातील या महत्त्वाच्या आणि भावनिक घटनेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देऊ शकतो. आता १४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होणारा बंटवारा १९४७ बॉक्स ऑफिसवर किती यश मिळवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










