लोकवाहिनी न्यूज
नागपूर : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला तिच्याच कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत बँकेच्या ३०३ कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे तब्बल ३११ कोटी ८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारातून स्टेट बँक ऑफ इंडियाकडून फसवणुकीच्या प्रकरणांची माहिती मागवली होती. त्यातून बँकेतील काही कर्मचाऱ्यांचाच विविध फसवणूक प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचे समोर आले. एक एप्रिल २०२३ ते एकतीस मार्च २०२४ या कालावधीत १४ हजार ७१७ प्रकरणांमध्ये २ हजार ४४५ कोटी ७६ लाख रुपयांची फसवणूक झाली. त्यानंतर २०२४-२५ या वर्षात १३ हजार ७८२ प्रकरणांमध्ये २ हजार १२२ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक नोंदवण्यात आली. तर २०२५-२६ या वर्षात २ हजार २४७ प्रकरणांमध्ये १ हजार ७४५ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद आहे.
२०२३-२४ मध्ये ११४ कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेल्या प्रकरणांमुळे १३७ कोटी ४ लाख रुपयांचा फटका बसला. २०२४-२५ मध्ये १०० कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये ७० कोटी १८ लाख रुपयांचे नुकसान झाले. तर २०२५-२६ मध्ये ८९ कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे १०३ कोटी ६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. तिन्ही वर्षांतील आकडेवारी एकत्रित केल्यास ३०३ कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे बँकेला तब्बल ३११ कोटी ८ लाख रुपयांचा फटका बसल्याचे बँकेचे केंद्रीय जनमाहिती अधिकारी तथा उपमहाव्यवस्थापक राकेश एमा यांनी दिलेल्या माहिती नमूद करण्यात आले आहे.
एक एप्रिल २०२३ ते एकतीस मार्च २०२६ या कालावधीत सर्वाधिक फसवणुकीची प्रकरणे पश्चिम बंगालमध्ये नोंदवली गेली. तेथे ३ हजार ४२६ प्रकरणांमध्ये १४३ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या आणि त्यामधील रक्कम दोन्हीमध्ये घट झालेली दिसून येते. मात्र, कर्मचाऱ्यांचाच काही प्रकरणांमध्ये सहभाग आढळल्याने बँकेच्या अंतर्गत नियंत्रण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये २०२३-२४ या वर्षात १३ हजार २३७ सायबर फसवणुकीच्या प्रकरणामध्ये ९० कोटी १७ लाख रुपयांची रक्कम गुंतली होती. २०२४-२५ मध्ये ही संख्या १० हजार २६० प्रकरणांवर आली आणि फसवणुकीची रक्कम ६६ कोटी ७० लाख रुपये इतकी राहिली. विशेष म्हणजे २०२५-२६ मध्ये केवळ ८३ प्रकरणांमध्ये ९ कोटी ६ लाख रुपयांची सायबर फसवणूक नोंदवण्यात आली. त्यामुळे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे.













