मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. शहराध्यक्षपद मिळाल्यामुळे ते अतिउत्साहात आहे. नागपूर शहर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याचे सर्वांनाच माहिती असल्यामुळे त्यांच्या गटातीलच लोक त्यांचे राजकीय शटर बंद करतील, अशी टीका जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय व प्रशासकीय विषयांवर भूमिका स्पष्ट केले. भाजपच्या नगरसेवकांच्या प्रशिक्षण दौऱ्याबाबत बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, नागपूर शहर व जिल्ह्यातील सर्व नगरसेवक स्वतःच्या खर्चाने प्रशिक्षणासाठी जात आहेत. काही जण पर्यटनासाठीही जात असले तरी त्यांनी पक्षाकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता स्वखर्चाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाजपमधील आदर्श परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी खासदार नवनीत राणा यांच्याविषयी बोलताना त्यांनी त्यांना कष्टाळू व निष्ठावान कार्यकर्त्या संबोधिले.
देशात आणि भारतीय जनता पक्षात त्यांना मान्यता असून, त्यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची असल्याचे बावनकुळे म्हणाले. सबसिडीतील सवलतींबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, काही वेळा सवलती कमी झाल्याचे दिसते; मात्र परिस्थिती स्थिर झाल्यानंतर त्या पूर्ववत होतात. कोरोनाच्या काळातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि नंतर ती सामान्य झाली होती. आताही काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बोलताना बावनकुळे यांनी नरेंद्र मोदीजी यांचे नेतृत्व ऐतिहासिक असल्याचे सांगितले. भविष्यात त्यांच्यासारखा दीर्घ आणि प्रभावी कार्यकाळ पूर्ण करणे कोणत्याही नेत्यासाठी कठीण ठरेल, असे ते म्हणाले. महसुली नाल्यांच्या अतिक्रमणाबाबत बोलताना बावनकुळे यांनी राज्यभर विशेष मोहीम राबविण्याची घोषणा केली. राज्यातील महसुली नाले, पांदन रस्ते आणि शेतकऱ्यांच्या वाहतुकीचे मार्ग पूर्ववत करणे हे महसूल विभागाचे मूलभूत कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. महसुली नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण केल्यास पाण्याचा निचरा सुरळीत होईल, पूरस्थिती टळेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
घटक पक्षावर अन्याय होणार नाही
महायुतीतील अर्थखात्याच्या वाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि महायुतीचे वरिष्ठ नेते एकत्र बसून योग्य निर्णय घेतील. कोणत्याही घटक पक्षावर अन्याय होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.









