काँग्रेसच्या दाव्यानंतर नेते अलर्ट मोडवर
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीत भाजपची मते फूटू नयेत (क्रॉसव्होटिंग रोखण्यासाठी) आणि पक्षाचे सर्व नगरसेवक एकसंघ राहावेत, यासाठी भाजपने तगडी तटबंदी उभारली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाजप नागपूर महानगरपालिकेतील आपल्या सर्व नगरसेवकांना तब्बल तीन दिवस गोव्याला नेणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. नागपूरच्या स्थानिक राजकीय रणधुमाळी आणि दबावापासून दूर ठेवण्यासाठी या सर्व नगरसेवकांचा ‘टूर प्लॅन’ देखील निश्चित करण्यात आला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लढत कमालीची चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात ही थेट लढत होत आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपचे स्पष्ट संख्याबळ असले, तरी काँग्रेस नेत्यांनी ‘क्रॉसव्होटिंग’ (मते फुटणार) होणार असल्याचा मोठा दावा केला आहे. काँग्रेसचा हा दावा खोडून काढण्यासाठी आणि आपले संख्याबळ एकसंघ ठेवण्यासाठी भाजपने ‘मिशन नागपूर’ अंतर्गत सर्व नगरसेवकांना नागपूरबाहेर नेण्याचा मोठा प्लॅन आखला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० जूनपासून ते थेट मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १७ जूनपर्यंत नगरसेवकांना नागपूरबाहेर ठेवले जाणार आहे. १० जून रोजी सर्व नगरसेवकांची रेल्वे नागपुरातून मुंबईकडे रवानगी केली जाईल. ११ जूनला मुंबईत पोहोचल्यानंतर तिथून सर्वजण गोव्यासाठी रवाना होतील. ११ ते १४ जूनदरम्यान नगरसेवकांचा गोव्यात मुक्काम असेल.
१४ जून: गोव्याहून मुंबईत परतल्यानंतर सर्व नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. १५ आणि १६ जूनला मुंबईतील प्रसिद्ध ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ येथे नगरसेवकांसाठी खास दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे (अभ्यासवर्ग) आयोजन करण्यात आले आहे. १७ जूनला रेल्वेने सर्व नगरसेवक नागपूरला परततील. आणि १८ जून रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान पार पडेल.
नगरसेवकांना मुंबईतील ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ येथे नेण्यामागे पक्ष संघटन, प्रशासन आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मार्गदर्शन करण्याचा उद्देश असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, मतदानाच्या अवघे काही दिवस आधी आयोजित केलेला हा अभ्यासवर्ग आणि त्यानंतरचा गोवा दौरा यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण सहलीसाठी सर्व नगरसेवकांकडून काही प्रमाणात ‘सहकार्य रक्कम’ (वर्गणी) देखील गोळा करण्यात आल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसच्या दाव्याने धाकधूक
नागपूर पालिका क्षेत्रात भाजपचे वर्चस्व असले, तरी कोणत्याही परिस्थितीत पक्षाचे एकही मत फूटू नये आणि भाजपचे संख्याबळ भक्कम दिसावे, यासाठी पक्षश्रेष्ठींनी ही विशेष पावले उचलली आहेत. १७ जूनला नागपुरात परत येईपर्यंत हे सर्व नगरसेवक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या थेट देखरेखीखाली असणार आहेत. आता भाजपची ही ‘काउंसलिंग’ आणि ‘गोवा वारी’ काँग्रेसच्या दाव्याला खिळ घालण्यात किती यशस्वी ठरते? हे १८ जूनच्या मतदानानंतरच स्पष्ट होईल.











