कोहळे किंवा वंजारींची राजकीय वाटचाल ठरणारमनोहर चव्हाण
नागपूर : नागपूर पदवीधर विधान परिषद आणि अमरावती शिक्षक विधान परिषद या दोन जागेसाठी विदर्भात २३ ऑक्टोबरला मतदान शांततेत पार पडले. मतदानाच्या दिवशी शेवटच्या मिनिटापर्यंत कार्यकर्त्यांनी कसून जोर लावला. नागपूर विभागात कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी लढत झाली. त्यामुळे या जागेवर आपलाच उमेदवार कसा निवडून येईल, याची कार्यकर्त्यांकडून गोळाबेरीज लावणे सुरू झाले आहे. या गोळाबेरजेत आपलाच उमेदवार हमखास निवडून येणार अशा चर्चेला उधाण आले आहे. आज निवडणुकीचा निकाल हाती येणार असल्याने महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे आणि महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांची पुढील राजकीय वाटचाल ठरणार आहे.
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघात २ लाख ५५ हजार ६०३ मतदारांपैकी १ लाख ६५ हजार ५४१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकट्या नागपूर जिल्ह्यात ८७ हजार १५० तर त्या खालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात २३ हजार ४१९ मतदान झाल्याने या मतदारांच्या कौलावरच सुधाकर कोहळे आणि अभिजित वंजारी यांचे भाग्य अवलंबून राहणार आहे.
कराळे गुरुजींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारात जोरदार मुसंडी मारली होती. मात्र निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्यांची उमेदवारी पक्षाने नाकारल्याने त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा चाहतावर्ग मतदान करून त्यांची किती ताकद वाढवतात आणि ते कोणाची मते खाऊन कोणाला धक्का देतात, त्यावर सुद्धा निवडून येणाऱ्या उमेदवारांचे भाग्य अवलंबून राहणार आहे. सुधाकर कोहळे या उमेदवारासाठी अख्खी भाजप पक्षाची यंत्रणा शेवटच्या श्वासापर्यंत ताकत लावून होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते सदर निवडणूक प्रतिष्ठेची करून कामाला लागले होते. स्वतः मुख्यमंत्री या निवडणुकीत बारीक लक्ष देऊन होते, तर अभिजित वंजारी यांना दुसऱ्यांदा मुंबईला पाठवू यासाठी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी वगळता नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे खासदार, आमदार पक्षाचे ज्येष्ठ, आजी-माजी राजकीय पदाधिकारी लक्ष देऊन दिवसरात्र कामाला लागले होते. या मेहनतीची विजयाची माळ कोहळे की वंजारी या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात पडणार हे येत्या २० ऑक्टोबरलाच कळणार आहे एवढे मात्र खरे.
ही निवडणूक जरी पक्षावर आधारित होती, तेवढीच जातीय समीकरणावर सुद्धा आधारित होती. कोहळे कुणबी तर वंजारी तेली, नागपुरात तेली समाजाची मोठी संख्या असल्याने तेली मतदारांसह काँग्रेस आणि भाजपवर नाराज युवक-युवतींचे मते मलाच मिळणार, अशी आशा वंजारी यांना आहे तर कोहळेंना मला कुणबी मतदारांसह भाजप आणि भाजपवर विश्वास ठेवणारी युवक-युवतींचे मते मलाच मिळणार, त्यामुळे माझा विजय पक्काच, अशी आशा त्यांना आहे.
मतदानाच्या दिवशी दोन्ही पक्षाचे बूथप्रमुख, बूथावरील कार्यकर्ते सक्रिय असताना दिसले, मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कसरत करत होते. ज्या नगरात दहा किस गट्टा मते आहे, त्या ठिकाणी स्वतंत्र चारचाकी गाड्यांची व्यवस्था करीत होते.
मागील निवडणुकीत झालेली चूक या निवडणुकीत होणार नाही यासाठी भाजप कंबर कसून होती, तर मागच्या निवडणुकीची अमलात आणलेली रणनीती या निवडणुकीत वापरून आपला विजय कसा होईल, यावर काँग्रेस भर देऊन होती. हे काही का असले, निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत सर्वच उमेदवारांमध्ये विजय माझाच असा आत्मविश्वास बळकावत असला तरी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचा ‘किंग’ कोण होणार, हे आता हाती येणार निकालच सांगणार आहे.












