डॉ. प्रवीण महाजन यांचे न घाबरण्याचे आवाहन
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढत असताना शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. ‘आज येईल, उद्या येईल’ अशा अपेक्षेत पावसाची वाट पाहणाऱ्या जनतेची उत्सुकता वाढत असतानाच मान्सून पुढे ढकलल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. परिणामी राज्यातील अनेक भागांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, सध्याच्या धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती पाहता नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आव्हान जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांनी केले.
पावसाच्या प्रतीक्षेत केवळ माणूसच नाही तर पशुपक्षीही हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढली असून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत राज्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा हा दिलासा देणारा ठरत आहे.
राज्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात धरणांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा साठा सुमारे पाच टक्क्यांनी कमी असला तरी परिस्थिती चिंताजनक नसल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. राज्यातील धरणांमध्ये सध्या १० हजार ३४७.९१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय धरणांमध्ये ७७४२.०७ दलघमी मृत पाणीसाठाही उपलब्ध आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ अशी ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात यंदा तुलनेने कमी पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. पुणे विभागातील ७२४ धरणांमध्ये सध्या २३३४.४८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून ३१४०.०८ दलघमी मृत पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा साठा कमी असल्याचे दिसून येत आहे.
घाबरण्याची गरज नाही, पण पाणी जपून वापरा
तज्ज्ञांच्या मते, सध्याची परिस्थिती गंभीर नसली तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जबाबदारीने करणे आवश्यक आहे. मान्सून उशिरा येत असला तरी पावसाळ्यात धरणे पुन्हा भरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाणीटंचाईची भीती बाळगण्याचे कारण नाही.
धरणांमधील मृत पाणीसाठा हा विशेषतः दुष्काळी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवला जातो. अत्यंत कठीण काळात हाच साठा मानवी जीवनासाठी आधार ठरतो. त्यामुळे राज्यातील उपलब्ध पाणीसाठा पाहता सध्या घबराटीचे कारण नसले तरी पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रासाठी धरणांतील उपलब्ध पाणी हा दिलासा देणारा घटक ठरत असला तरी ‘पाणी आहे म्हणून उधळपट्टी’ आणि ‘पाऊस उशिरा आहे म्हणून घबराट’ या दोन्ही टोकांच्या भूमिका टाळणे गरजेचे आहे. कारण पाणी हेच भविष्यातील सर्वात मोठे नैसर्गिक भांडवल आहे आणि त्याचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले.












