काँग्रेसचे अतुल लोंढे यांचा पराजय : मतविभाजनाचा जबरदस्त फटका
लोकवाहिनी न्यूज
नागपूर: विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार राजीव पोतदार यांचा तब्बल ६८२ मतांनी विक्रमी विजय झाला आहे. तर काँग्रेसच्या अतुल लोंढेंना मतफुटीचा मोठा फटका बसला असून त्यांचा यात पराभव झाला आहे. काँग्रेसच्या अतुल लोंढेंना १३० मते मिळाली. दरम्यान, काँग्रेसचे स्वतःची १७० मते असताना आणि महाविकास आघाडीची एकूण २११ मते असताना काँग्रेस उमेदवाराला फक्त १३० मते मिळाली आहे. म्हणजेच महाविकास आघाडीसह काँग्रेस पक्षाची मतेही फुटल्याचे चित्र आहे.
काँग्रेसच्या ४० नगरसेवकांनी आपल्या उमेदवाराला मते दिली नाही. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचीही मते अतुल लोंढे यांना मिळू शकली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या छोट्या पक्षांसह अनेक काँग्रेस नगरसेवकांनी आम्हाला साथ दिली, अशी प्रतिक्रिया भाजपचे विजयी उमेदवार राजीव पोतदार यांनी दिली. चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दटके यांनीजी रणनीती आखली होती ती यशस्वी ठरली आणि एका भूतपूर्व विजय भाजपला नागपुरात मिळाला आहे. भाजपची शक्ती फक्त नागपूर शहरात नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात आहे. हे आजच्या निकालातून दिसून आले आहे.
भाजपने दहा-दहा लाख रुपये देऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार फोडले. मात्र मी कोणाचीही तक्रार करणार नाही. मी पराभूत झालो नाही, माझाच नैतिक विजय झालाय. अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसचे पराभूत उमेदवार अतुल लोंढे यांनी खळबजनक दावा केला आहे. भाजपने दहा-दहा लाख रुपये देऊन १०० मतांची क्रॉस वोटिंग करून घेतली, असा गंभीर आरोप नागपूर विधानपरिषद मतदारसंघातून काँग्रेसचे पराभूत उमेदवार अतुल लोंढे यांनी केला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या फुटलेल्या मतांसंदर्भात कोणालाही तक्रार करणार नाही असेही अतुल लोंढे म्हणाले. मुळात मी निवडणूक पराभूत झालेलो नाही, तर नैतिक दृष्टिकोनातून मी निवडणूक जिंकलो आहे. कारण नागपुरात भाजपच्या दादागिरी समोर मी उभं राहून निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही आणि किमान मला मिळालेले १३० काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार विकले गेले नाही, हेच या निवडणुकीतून सिद्ध झालंय, असं अतुल लोंढे म्हणाले..
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात सकाळी आठ वाजता निवडणूक निरीक्षक संजय यादव आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निरीक्षणाखाली मतमोजणीला सुरुवात झाली.
मतमोजणीसाठी एकूण चार टेबल ठेवण्यात आले. अतुल लोंढे यांना एकूण १३० मते मिळाली. भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांना ६८२ मते मिळाली. १८ जून रोजी झालेल्या मतदानात १४ मतदान केंद्रांवर ८३६ पैकी ८२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नागपूर शहरात ११ तर उमरेड, कामठीतील प्रत्येकी एक अशा १३ सदस्यांनी मतदान केले नव्हते. या निवडणुकीत एकूण सुमारे ९८.४४ टक्के मतदान झाले होते. निकाल झाल्यानंतर निवडणूक आयोगाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. राजीव पोतदार यांना प्रदान केले.










