लोकवाहिनी न्यूज
मुंबई : विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला अत्यंत हतबल दिसले, स्वतःचेच पंख छाट असल्याचे त्यांना जाणवत होते, असा दावा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीतील सभेत बोलताना केला. दरम्यान, या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली की, मला पंखच नाहीत, तर कोण माझे पंख छाटणार? असा प्रतिप्रश्न करत ठाकरेंच्या आरोपांना फारसे महत्त्व नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण निर्माण झाले आहे. परभणी दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी विमानप्रवासादरम्यान झालेल्या भेटीचा उल्लेख करत, ते त्यावेळी अत्यंत अस्वस्थ आणि हतबल दिसत होते, असा दावा केला. परभणीमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर निशाणा साधला. त्यांनी दावा केला की, राज्यात ऑपरेशन टायगर नावाने एक राजकीय मोहीम सुरू असून, त्याचा उद्देश मुख्यमंत्री फडणवीस यांचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा आहे. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर काही घडामोडी सुरू असल्याचे सूचक वक्तव्य करत, त्यांनी फडणवीस यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजकीय प्रवासाशी केली. ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी विमानात भेटले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासापेक्षा चिंता अधिक दिसत होते. त्यांच्या देहबोलीतून ते काहीतरी वेगळ्या दबावाखाली असल्याचे जाणवत होते. ज्याप्रमाणे पूर्वी भाजपमध्ये काही वरिष्ठ नेत्यांचे महत्त्व कमी करण्यात आले, त्याच पद्धतीने आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य करत, पक्षात मोठे योगदान देणाऱ्या नेत्यांनाही वेळ आल्यावर बाजूला केले जाते, असा दावा केला. नितीन गडकरी यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत, पक्षात एकेकाळी प्रभावी असलेल्या नेत्यांची परिस्थिती कशी बदलली, याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत संयत पण मिश्किल शैलीत उत्तर दिले. माझे पंखच नाहीत, मग ते छाटणार कोण? असा प्रतिप्रश्न करत त्यांनी ठाकरे यांच्या आरोपांना फारसे महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले की, आपल्या कामामागे महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद आहे. त्याचबरोबर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा पूर्ण पाठिंबा आपल्याला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अशा प्रकारच्या राजकीय चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सूचित केले. विमानप्रवासाच्या संदर्भातील प्रश्नावरही फडणवीस यांनी हलक्याफुलक्या अंदाजात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, विमानात आम्ही दोघे होतो हे खरे, मात्र आम्ही एकमेकांच्या शेजारी बसलो नव्हतो. जर शेजारी बसलो असतो, तर सहज गप्पा मारल्या असत्या. त्यामध्ये विशेष काही शोधण्याचे कारण नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहण्याची गरज नसल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सार्वजनिक जीवनात अनेकदा विरोधी पक्षातील नेतेही एकाच कार्यक्रमात किंवा प्रवासात भेटतात.












