दृष्टिहीनांची दिव्यांग वारी पंढरपूरसाठी सज्ज | ४ जुलै रोजी यवतमाळहून प्रस्थान
लोकवाहिनी न्यूज
यवतमाळ : सेवा समर्पण प्रतिष्ठान ट्रस्ट, यवतमाळ अंतर्गत दिव्यांग सेवा समितीद्वारा संत सूरदास महाराज दिव्यांग (अंध) पायी वारी २०२६ चे यंदा ४ जुलै रोजी यवतमाळहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या वारीचे हे तिसरे वर्ष आहे. जगाला डोळे उघडूनही न दिसणारा तो सावळा विठ्ठल, या दृष्टिहीन माऊलींना अंतर्मनाने दिसणार आहे.
दिव्यांग बांधव आणि भगिनी यवतमाळ ते पंढरपूर असा तब्बल ५२१ किलोमीटरचा टप्पा पायी पार करणार आहेत. वाटेत २२ गावांचे थांबे घेत केवळ विठ्ठल नामाच्या गजर करत ही पाऊले पुढे पडणार आहेत. हा दिंडी सोहळा रोज नवनवीन गावा पार करत २५ जुलैला विठूरायाच्या दारी पोहोचेल. वारीचा २२ गावात मुक्काम राहणार आहे. हिवरी, आर्णी, दिग्रस, पुसद, शेंबाळपिंपरी, कळमनुरी, हिंगोली, औंढा नागनाथ, हट्टा, परभणी, पोकर्णी, गंगाखेड, परळी वैजनाथ, आंबेजोगाई, पावनधाम, कळंब, येरमाळा, बार्शी, कुर्डूवाड, शेटफळ, रोपडे असा प्रवास करत ही दिंडी २५ जुलै रोजी पंढरपूर येथे ही दखल होऊन विठ्ठल दर्शन घेणार आहे.
‘माऊली माऊली’ हा गजर दरवर्षी आषाढीला अवघ्या महाराष्ट्राला कवेत घेतो. डोळ्यांत विठूरायाच्या दर्शनाची आस घेऊन लाखो वारकरी पंढरीची वाट चालतात. पण, ज्यांच्या नशिबात हे जग पाहण्याचे सुख नाही, ज्यांच्या डोळ्यांसमोर फक्त अंधार आहे, ते जेव्हा पंढरीची वाट धरतात, तेव्हा ही वारी भक्ती, जिद्द आणि आत्मविश्वासाचा एक अभूतपूर्व सोहळा ठरते. महाराष्ट्राच्या इतिहासात यवतमाळकरांनी कोरलेला दिव्यांग वारीचा हा सुवर्ण क्षण पुन्हा एकदा अनुभवा येणार आहे.
या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे, या अंध माऊलींच्या प्रवासाची, त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय महाराष्ट्रातील संवेदनशील अन्नदात्यांनी आणि यजमानांनी आनंदाने उचलली आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावातील दानशूर व्यक्ती आणि संस्था या दिव्यांग वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. हे दृश्यच माणसाच्या माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करणारे आहे.
सन २०२४ मध्ये दिव्यांगांनी पहिली पायी वारी काढून महाराष्ट्राच्या इतिहासात यवतमाळचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले होते. तोच वारसा पुढे चालवत सेवा समर्पण ट्रस्टचे अध्यक्ष आणि वारी संयोजक प्रशांत विश्वनाथराव बनगीनवार आणि प्राची प्रशांत बनगीनवार यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश राठी, डॉ. आलोक गुप्ता, सचिव अनंत कौलगिकर, कोषाध्यक्ष दीपक बागडी आणि दिव्यांग सेवा प्रकल्पाची संपूर्ण टीम या सोहळ्याच्या नियोजनात अहोरात्र झटत आहे.











