मुसळधार पावसासाठी जुलैची प्रतीक्षा
पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : केरळमध्ये ४ जून रोजी मान्सूनच्या सरी कोसळल्या. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती मिळाली नाही. आतापर्यंत भारतात पावसाची ४३ टक्के तूट आहे. या महिन्यात द्वीपल्पात वेगाने वाटचाल करत जूनच्या अखेरीस मोसमी वारे संपूर्ण देशभर पोहचायला हवे होते. पण अजूनही देशातील अनेक भागांमध्ये कोरड वातावरण आणि निरभ्र आकाश दिसून येत आहे. मध्य भारतात पावसाची ५९ टक्के तूट आहे तर गुजरातमध्ये तब्बल ८४ टक्के कमी पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रातही सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाचा जून महिना गेल्या १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून असल्याचे सांगितले जात आहे. आधीच उशिरा आगमन झालेल्या मान्सूनमुळे बळीराजाची कामे खोळंबली असताना बहुतांश भागात समाधानकारक पाऊस न पडल्याचे चित्र आहे.
मान्सून १५ जूनपर्यंत दक्षिण, पूर्व, ईशान्य भारतातील बहुतांश भागांमध्ये व्यापला होता. त्यानंतर मोसमी वाऱ्यांची वाटचाल अचानक थांबली. दरम्यान, काही भागांमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला. मुंबई आणि परिसरात २३ ते २४ जून दरम्यान २४ तास मुसळधार पाऊस झाला. पण त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत कोरडं वातावरण निर्माण झालं. तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुण्यातही गेल्या काही दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला असला तरी शहरात फक्त हलक्या सरींची नोंद झाली आहे. घाट परिसरात तर तुरळक पाऊसचं नोंदला गेला.
एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा जरी झाली असली तरी त्याची तीव्रता हिवाळ्यापर्यंत वाढू लागते. जुलै, ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांमध्ये मान्सूनवरील पकड मजबूत होते. त्यामुळे जून महिन्यात झालेल्या कमकुवत पावसाला एल निनो जबाबदार नाही हे स्पष्ट होतं.











