संगीत-नृत्य महोत्सव ‘ताल चक्र’ला भरघोस प्रतिसाद
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : पद्मश्री विजय घाटे यांचे तबला वादन जोडीला कथक नृत्यांगना शीतल कोळवलकर यांचे अप्रतिम नृत्य सादरीकरण आणि दुसऱ्या सत्रात शास्त्रीय गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांचा सुरेल ‘अभंग रास’ असा ताल, लय आणि भाव यांचा अद्वितीय मिलाफ आज संगीत आणि नृत्य प्रेमींनी अनुभवला. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत आणि सप्तक, नागपूरच्या वतीने भारतीय शास्त्रीय संगीत, तालवाद्य आणि नृत्यकलेचा अनोखा संगम असलेला ‘ताल चक्र’ हा विशेष कार्यक्रम आज रविवारी कविकुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टिम, आयटी पार्क, नागपूर येथे संपन्न झाला.
भारतीय तबलावादन क्षेत्रातील दिग्गज कलाकार पद्मश्री विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात तबला वादन आणि नृत्यविष्कार बघायला मिळाले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरवात झाली आणि मग कर्तृत्व करणारी शिवस्तुती… हे शिवशंकर हे करुणाकर चे गायन गायक प्रफुल सोनकांबळे यांनी केले. त्यांना संवादिनीवर अभिषेक शिनकर, तबल्यावर खुद्द विजय घाटे आणि शिष्य सागर पटोकार यांनी यावेळी साथसंगत केली.
यावेळी त्यांनी आपल्या विविध वादनशैलींचे दर्शन घडवत विशेषतः न्हैवक्का प्रकारातील तबला आणि द्रुत रूपक यांचे प्रभावी सादरीकरण करून श्रोत्यांवर मोहिनी घातली. तबल्याच्या भाषेतील त्यांच्या नवनवीन प्रयोगांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. पद्मविभूषण बिरजू महाराज यांच्या एका रचनेवरील नृत्यप्रकाराला दिलेल्या तबला साथीचे विशेष कौतुक झाले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या ‘अभंग रास’ अंतर्गत अभंगाची विशेष मैफल सादर करण्यात आली. महाराष्ट्राची संत परंपरा या माध्यमाने साजरा करण्यात आली. संत तुकाराम महाराजांच्या जय जय राम कृष्ण हरी या मंत्राच्या सुरेल गायनाने कार्यक्रम सुरू झाला आणि त्यानंतर एकापेक्षा एक सरस सादरीकरणे झाली.











