सुदानला स्फोटक पुरवल्याचा आरोप
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील स्फोटक निर्मिती प्रकल्पात १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटात २६ कामगारांचा बळी गेल्यानंतर चर्चेत आलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. सुदानमधील यादवी संघर्षाला खतपाणी घालणाऱ्या स्फोटक पुरवठा साखळीचा भाग असल्याचा आरोप करत अमेरिकेने कंपनीसह तिचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक चौधरी यांच्यावरही कारवाई केली आहे.
अमेरिकेच्या वित्त विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेट्स कंट्रोल’ (ओएफसी) ने गुरुवारी ही कारवाई जाहीर केली. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, एसबीएल एनर्जीने २०२४ पासून सुदानमधील ‘टार्गेट मल्टिॲक्टिव्हिटी कंपनी’ या संस्थेला २०० हून अधिक स्फोटके व स्फोटकसंबंधित साहित्याच्या खेपा पाठवल्या. या साहित्याचा वापर सुदानी सशस्त्र दलांकडून बॉम्बनिर्मितीसाठी करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएलच्या कारखान्यात १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटाने राज्यभर खळबळ उडाली होती. या दुर्घटनेत २६ कामगारांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये महिला कामगारांचाही मोठा समावेश होता. घटनेनंतर कारखान्यातील सुरक्षाव्यवस्था, स्फोटक हाताळणीचे नियम आणि प्रशासनाच्या देखरेखीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. या प्रकरणाची चौकशी अद्याप विविध स्तरांवर सुरू आहे.
या कारवाईनंतर अमेरिकेतील कंपनीची मालमत्ता गोठवली जाऊ शकते. तसेच अमेरिकन नागरिक, कंपन्या आणि वित्तीय संस्थांना एसबीएल किंवा संबंधित व्यक्तींशी व्यवहार करण्यास मनाई असेल. त्यामुळे कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यापार, बँकिंग आणि आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राऊळगाव दुर्घटनेच्या केंद्रस्थानी असलेल्या एसबीएल एनर्जीसमोर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे नवे संकट उभे ठाकले आहे. अमेरिकेच्या या कारवाईमुळे कंपनीच्या कामकाजावर आणि प्रतिमेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परिणाम काय होणार?
सुदानमध्ये एप्रिल २०२३ पासून सुरू असलेल्या यादवी संघर्षात सुदानी सशस्त्र दल आणि रॅपिड सपोर्ट फोर्सेस यांच्यात भीषण लढाया सुरू आहेत. या संघर्षामुळे मोठे मानवी संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शस्त्रे, स्फोटके आणि अन्य लष्करी साहित्य पुरविणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कविरोधात अमेरिकेने कारवाई सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून एसबीएल एनर्जी आणि आलोक चौधरी यांना निर्बंधांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले.











