लोकवाहिनी न्यूज
चंद्रपूर: अथक परिश्रम, जिद्द आणि कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवत प्रशासकीय अधिकारीपद गाठले. नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत साठवून नव्या जबाबदारीच्या दिशेने कुटुंबासह प्रवास सुरू केला, मात्र नियतीने वाटेतच काळाचा घाला घातला. समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात प्रशासकीय अधिकारी आरती भास्कर जीवने, त्यांचे अभियंता पती भास्कर जीवने, १२ वर्षीय कन्या तुषा, सासू लता जीवने आणि सासरे महादेव जीवने अशा एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेने चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली.
आरती जीवने या चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. शासकीय सेवेतील जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कधीही सोडली नाही. मागील तीन-चार वर्षांपासून बालविकास प्रकल्प अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी समर्थपणे सांभाळला. दिवसाची सरकारी जबाबदारी आणि रात्रीचा अभ्यास अशा कठोर दिनक्रमातून त्यांनी एमपीएससीमध्ये यश मिळवत आरोग्य विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड मिळविली.
२४ जून रोजी जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना कार्यमुक्त केले आणि २५ जून रोजी त्यांनी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. सलग सुट्ट्यांमुळे त्या चंद्रपूरला परतल्या होत्या. सोमवारपासून नव्या जबाबदारीवर रुजू होण्यासाठी आवश्यक सामान घेऊन त्या रविवारी सकाळी कुटुंबासह अकोलाकडे निघाल्या. मात्र, धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारची उभ्या कंटेनरला भीषण धडक बसली आणि काही क्षणांत संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला.
आरती जीवने यांचे पती भास्कर जीवने हे आयआयटी खडकपूर येथून मायनिंग इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित अभियंता होते. ओडिशामध्ये काही वर्षे सेवा केल्यानंतर त्यांची वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली)च्या नागपूर मुख्यालयात नियुक्ती झाली होती. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी चंद्रपूरच्या भटाळी क्षेत्रात वरिष्ठ अभियंता म्हणून पदभार स्वीकारला होता. रजेवर असताना पत्नीच्या नव्या नियुक्तीसाठी संपूर्ण कुटुंबासह ते अकोल्याकडे रवाना झाले होते. त्यांचे वडील महादेव जीवने हेही वेकोलीचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.
दुर्घटनेची माहिती चंद्रपूरमध्ये पोहोचताच बापू पेठ येथील त्यांच्या निवासस्थानी आणि तुकूम परिसरातील बियाणीनगर येथील घरासमोर शोकाकुल नागरिक, नातेवाईक आणि मित्रपरिवाराची गर्दी झाली. धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाचही मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. काही तासांपूर्वी भविष्याच्या आनंददायी वाटचालीची चर्चा करणारे कुटुंब एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेले होते.
आरती जीवने यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी पंचायत समितीतील सहकारी त्यांना निरोप समारंभ देण्याच्या तयारीत होते. ‘मी नक्की येईन’ असे त्यांनी सहकाऱ्यांना आश्वासन दिले होते. मात्र, नियतीने त्यांना त्या समारंभापर्यंत पोहोचूच दिले नाही. सहकाऱ्यांचा निरोप स्वीकारण्याआधीच त्यांनी या जगालाच कायमचा निरोप दिला.
आरती जीवने यांचा प्रवास हा ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला होता. कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मोठे यश मिळविता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. तर भास्कर जीवने यांनीही उच्च शिक्षण आणि गुणवत्तेच्या बळावर अभियांत्रिकी क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले होते. अशा दोन गुणी व्यक्तमत्त्वांसह निरागस तुषाचेही आयुष्य एका क्षणात संपत आल्याने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघाताने केवळ पाच जीव हिरावले नाहीत, तर एका कुटुंबाची स्वप्ने, अनेकांच्या आशा आणि उज्ज्वल भविष्याची शक्यता कायमची संपविली. पदोन्नतीचा आनंद साजरा करण्यासाठी सुरू झालेला प्रवास अखेर अंत्ययात्रेत परिवर्तित झाला आणि चंद्रपूरच्या स्मरणात कायमचा कोरा जाणार हा दुःखद अध्याय ठरला.













