पोलीस आयुक्तपद स्वीकारताच संघाच्या भाषणावर दिले स्पष्टीकरण
लोकवाहिनी न्यूज
नागपूर: आपण केलेले संपूर्ण भाषण कायद्याच्या चौकटीत असून त्याचा विपर्यास केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. मी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असून माझी कटिबद्धता भारतीय संविधानाशी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि संविधानातील मूल्यांचा आम्ही आदर करतो. कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच समाजात जनजागृती आणि प्रबोधन करणे हेही पोलीस विभागाचे कर्तव्य आहे, असे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आणि नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील बोलताना म्हणाले.
नवी मुंबईतील ‘सकल हिंदू समाजाच्या’ एका संमेलनात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉ. हेडगेवार यांच्या कार्याचा गौरव केला होता. यावर काँग्रेसने टीका केली होती. यानंतर सोमवारी नांगरे-पाटील यांनी पदभार स्वीकारल्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना यावर स्पष्टीकरण दिले.
ते पुढे म्हणाले, वादाच्या केंद्रस्थानी असलेला कार्यक्रम १९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. सकल हिंदू समाज, सांपाडा यांच्या निमंत्रणावरून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात योग, करप्रणाली आणि अध्यात्म या विषयांवरील विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रम सर्व कुटुंबांसाठी खुला होता. त्यात मी मानवी कल्याणासाठीच्या सामूहिक प्रार्थना बोलून दाखविल्या. त्या भाषणामध्ये मी ज्ञानेश्वरीतील प्रार्थनादेखील म्हटली होती. तसेच अमली पदार्थांमुळे तरुणाईचे होणारे नुकसान, पोलीस दलातील संधी याबाबतदेखील बोललो होतो. तो कार्यक्रम ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष व संघाला शंभर वर्ष झाल्याबाबत होता. त्यामुळे मी कुठल्याही नियमाचे उल्लंघन केले आहे असे वाटत नाही, असे विश्वास नांगरे पाटील म्हणाले.
बनावट एन्काउंटर नाही, पण…
खांद्यावरचे ‘आयपीएस’ फक्त मिरवण्यासाठी नाही, तर जनसेवेशी बांधील आहे. मानवी मूल्ये आणि संविधानाशी माझी कटिबद्धता आहे. कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी मी वचनबद्ध आहे. मिलमिळीत वागणे हा माझा स्वभाव नाही. कायदा हाती घेणाऱ्यांना वठणीवर आणणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखणे, कोर पोलिसिंग, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. बनावट एन्काउंटर करणार नाही, पण गुन्हेगारांना सोडणारही नाही, अशा शब्दांत नांगरे पाटील यांनी इशारा दिला.
कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी मी वचनबद्ध आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर मुंबईत १०० निर्भया पथके तयार केली होती. त्याच धर्तीवर नागपुरातही अभियान राबवले जाईल. रात्रीची गस्त हा माझ्या आवडीचा विषय आहे. शहरातला एकेक कोपरा मी पिंजून काढेल. लोकसंख्या आणि भूभागाच्या आधारे आव्हानांचे वर्गीकरण करून त्या भागात पोलीस गस्त वाढवून काम करेल, असेही नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.











