लोकवाहिनी न्यूज
मुंबई : ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. आजचे १८ हजार शेतकरी गट पुढील काळात ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्षा निवासस्थानी पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित ‘फार्मर कप २०२६’च्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमीर खान आणि इतर यावेळी उपस्थित होते. झूम लिंकद्वारे राज्यातील शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी स्मार्ट शेती ॲपचे लोकार्पण करण्यात आले. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी २६ ऑगस्ट २०२५ पासून राज्यभरात ४६ तालुक्यात सुरू असलेल्या फार्मर कपच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
फडणवीस म्हणाले की, ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास भविष्यातील कृषी परिवर्तनाचा मजबूत पाया ठरेल. फार्मर कपमधील १८ हजार शेतकरी गट महाराष्ट्रातील शेती क्रांतीचे शिल्पकार ठरतील, तर त्यांच्या अनुभवातून लाखो शेतकरी प्रेरणा घेतील. शेतीच्या मालकीमध्ये नाव नसलेल्या महिलांना अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता देणारे महिला शेतकरी विधेयक लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मागील वर्षी फार्मर कपमध्ये सहभागी गटांमध्ये सोयाबीन, कापूस आणि मक्याच्या उत्पादनात सरासरी ७१ टक्के वाढ झाली असून, सामूहिक खरेदीमुळे १,५८४ कोटी रुपयांची बचत आणि सामूहिक श्रमांमुळे प्रति एकर सुमारे ६ हजार रुपयांची मजुरी वाचल्याचे त्यांनी सांगितले. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन.
मुख्यमंञी देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असल्याचे नमूद करत, महाराष्ट्र हे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. महाविस्तार ॲप आणि फार्मर कपमधील माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन केले जाईल तसेच या अनुभवाच्या आधारे कृषी धोरणांमध्ये आवश्यक बदल केले जातील. अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे आवाहन करत, जलयुक्त शिवारसारख्या उपक्रमांनी पूर्वी दुष्काळी परिस्थितीत मोठा दिलासा दिल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी सांगितले परिवर्तनाचे अनुभव
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध जिल्हे आणि तालुक्यांतील शेतकरी गट, कृषी विभागाचे अधिकारी तसेच उमेदच्या मार्गदर्शकांशी थेट संवाद साधला. यावेळी अनेक शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांनी ‘सत्यमेव जयते फार्मर कप’मुळे झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव मांडले. १६ महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन २४ एकरांवर यशस्वी गटशेती करणाऱ्या चैत्राली यांनी स्वतःचा प्रेरणादायी प्रवास सांगितला. नंदुरबारचे सहायक कृषी अधिकारी अर्जुन पावरा यांनी दुर्गम भागातील शेतकऱ्यांसोबत काम करतानाचे अनुभव मांडले, तर नाशिकच्या अन्नदाता शेतकरी गटाने सामूहिक शेतीमुळे ५ लाख रुपयांची बचत केल्याची माहिती दिली. चंदगडच्या लीना लोबो यांनी शेतीबाबत तरुणांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. ठाण्यातील जय भवानी भात उत्पादक शेतकरी गटाने विषमुक्त शेती आणि स्वच्छता अभियानाची माहिती दिली, तर महाड, पुणे, परभणी आणि भंडारा येथील शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांनी गटशेती, पाणी व्यवस्थापन, उत्पादनवाढ आणि फार्मर कपमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या आत्मविश्वासाचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
लोकसहभागातून शेती समृद्धीचा मार्ग
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, सामूहिक शेती आणि नियोजनबद्ध गटशेतीमुळे उत्पादन व उत्पन्न दोन्ही वाढू शकते. फार्मर कप उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, महिलांच्या सहभागाचे विशेष कौतुक आहे. नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासन कर्जमाफी, वीज सवलती आणि विविध योजनांद्वारे सातत्याने मदत करत असून, या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.









